मी नोकरीवर अलिबागला रुजू झालो..
येणारी प्रत्येक केस माझ्या पुस्तकी ज्ञानात भर टाकत होती. प्रत्येक पेशंट शिकवत होता.
त्या दुपारी अशीच एक स्त्री आली.
लग्न होऊन ११ वर्षांनंतर
नवसासायासाने आलेले गर्भारपण. पण काय व्हावं ?
आमच्या अलिबागच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या बैलानं नेमकी हिला ढुशी दिली आणि शिंग तिच्या पोटाला भोसकून बाहेर आलं !
तिला साऱ्यांनी मिळून हॉस्पिटल
मध्ये आणलं होतं.
जखम पाहिली तर पोट भोसकले गेले होते.
त्यामधून डोकावत होतं उदरपोकळीचं संरक्षक आवरण, आतड्यांचं एक वळण व बाळाचा एक हात !
जखम अगदी नुकतीच झालेली होती.
हाताच्या आणि आतड्याच्या हालचाली दिसत होत्या.
ही ७ महिन्यांची पहिलटकरीण.
तिच्या दृष्टीनं हे दृश्य काही बरे लक्षण नव्हते. शिंगाने गर्भाशयाची भिंतही छेदली होती. त्यातून बाहेर आलेला तो चिमुकला हात ‘काही तरी करा हो’ म्हणून विनवणी करीत होता जणू.
परिस्थिती गंभीर होती.
आता एकूण प्रसंग बघा.
गर्भाशयाला इजा म्हणजे बाळालाही इजा झालेली असण्याची शक्यता.
तसं असेल तर आता सातव्यातच बाळंतपण करावं लागणार. म्हणजे मग मूल जगण्याची आशा फारच कमी.
त्या साठीही सिझेरियन करावं लागणार, म्हणजे पोटावर वण येणार आणि शिवाय मुलाचीही खात्री नाही. काय उपयोग ?
आईच्या जीवासाठी हे करणं भाग पडू शकते आणि मुलाच्या जीवाला धोका संभवू शकतो ही गोष्ट मी नातेवाईकांना तातडीने समजावून सांगितली.
आता त्या घरातलं हे बाळ म्हणजे
किती मोलाचं कौतुक.
त्याच्या जन्मघडीची सारे घरदार वाट बघत बसलेलं. किती बेत, किती स्वप्नं जन्माआधीच त्याच्या भोवती विणलेली असतील !
रोजच्या रस्त्याने जाता-जाता सांडाने सारं क्षणात उधळून दिलं.
मी सांगायला गेल्यावर त्यांनी निक्षून सांगितलं, “की आईचा जीव वाचवायचा बघा. बाळाला हात लावू नका.”
ते मला लिहून द्यायला तयार होते.
पण त्यांच्या सहीने शस्त्रक्रियेमधील प्रश्न कुठे सुटत होता ?
तांत्रिक बाबी पुऱ्या होतील पण सद्सद्विवेक बुद्धीचं काय ?
मी बाळाबाबतची त्यांची अट न स्वीकारता ऑपरेशन करण्याचे मान्य केलं.
मुला बाबत काहीही न केलं तर आईच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, अशा वेळी मला योग्य वाटेल ते मी करीन असे सांगितले. पण ते ठाम होते.
प्रसंग आणीबाणीचा होता. मी माझ्या विवेकाला स्मरुन ठरवलं, की बाहेर आलेला हात आत लोटून गर्भाशय शिवून घेता आले तर ठीक. नाहीतर बाळंतपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन जादा रक्तस्त्राव झाल्यामुळे आईचा जीव वाचवण्यासाठी हे करावं लागलं, असं सांगण्याचं मी ठरवलं.
मी नाही म्हटले असते तर ते तरी कोठे जाणार होते?
१०० मैलांपर्यंत काही सोयीही नव्हत्या.
मी पोटावर छेद घेतला. इतर इजा
फार गंभीर नव्हती. गर्भाशयानेच
पुढे राहून इतर अवयवांचे रक्षण केले होते. पण बाळाचा हात काही केल्या आत जाईना.
गर्भाशयाचे स्नायू चांगलेच जाड व भक्कम असतात. हाताभोवती
त्यांचं घट्ट आकुंचन झाले होते.
गर्भाशयाला सुदैवाने दुसरी काही इजा नव्हती.
हा एवढा हात आत गेला आणि जखम शिवली की माझं कर्तव्य पार पडलं असं माझ्या मनात येत होतं.
पण नेमकं तेच होत नव्हतं आणि तो चिमुकला हात आता पांढरा पडायला लागला होता. हे लक्षण धोक्याचं होतं. रुधिराभिसरण थांबलं की अवयव प्रथम निळा पडतो आणि मग पांढरा.
पुढचा टप्पा म्हणजे गॅंगरीन !
हात कापून तर गर्भाशय शिवता येणार नव्हते.
माझ्या मनात असला विचार डोकावून गेला याचाच मला धक्का बसला.
पण मी घायकुतीला आलो होतो आणि या छोट्या हाताशी झगडताना रंजीस आलो होतो.
माझ्यावरचा हा पेचप्रसंग आमच्या जुन्या वॉर्डबॉयच्या लक्षात आला.
त्याचं नाव सांडे !
तो ऑपरेशन थिएटर मध्ये डोकावला. आता हा प्राणी कायमच प्यायलेला असायचा. तारेतच चालायचा.
त्याच्या ‘ आनंदाला ‘ व्यत्यय तो कसा माहीतच नव्हता.
त्याला बघता क्षणी वाटायचं, याला ‘चालता हो’ म्हणावं.
पण त्याचा कुणाला त्रास नसे आणि त्याचं काम तो चोख करीत असे.
थिएटरची स्वच्छता आणि शस्त्र क्रियेची सामुग्री निर्जंतुक करणं ही त्याची नेमलेली कामं.
आधीच माझ्याकडे मनुष्य बळ कमी.
त्यात याला जाऊ देणं परवडण्यासारखं नव्हतं.
शिवाय त्याची एक जमेची बाजू म्हणजे त्याच्या कधीही दांड्या नसायच्या.
नेहमी कामावर हजर !
मी तो हात हलके आत लोटण्यासाठी झगडत होतो.
तेवढ्यात सांडे म्हणाला, “साहेब, गरम सुईचा चटका द्या हाताला.. हात दचकून मागे जाईल ! “
मी मेडिकलचे शिक्षण घेतलं त्या रुग्णालयात किंवा अभ्यासासाठी पालथ्या घातलेल्या पुस्तकांत ही सूचना नव्हती.. पण माझे सर्व पर्याय संपले होते…
मन घट्ट करून आणि परमेश्वराचे नाव घेऊन, मनात लाख वेळा त्या बाळाला सॉरी म्हणत एक इंजेक्शनची सुई लाल तापवून मी त्या हातावर टेकवली…
आणि………. खरंच हात आत गेला !
मुलानं ओढून घेतला म्हणायला हवं.
मग सगळं एकदम सोपं झालं.
आश्चर्य म्हणजे बाई पूर्ण दिवस घेऊन सुखरूप बाळंत झाली आणि बाळाच्या हातावर डागाचा कसलाही मागमूस नव्हता !
हा सगळा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल.
गुरू, हा माणसाला कोणत्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही हेच खरे.
कल्पनातीत अडथळ्यांमधूनही सुखरूप सुटका हे अघटीतच घडले होते.
यालाच, ‘ही तर श्रींची इच्छा’ म्हणत असावेत.
हा आमचा वॉर्डबॉय आता हयात नाही. मी इतर कुणाची नावे घेतली नाहीत, पण या थरार नाट्याच्या सुखांत शेवटाचे श्रेय
हे त्याचेच आहे.
पुढे त्याच्या ‘ सांडे ‘ आडनावावरून आमच्यात एक
विनोद प्रचलित झाला होता,
‘सांडानं मारलं पण सांडेनं तारलं ! ‘
( ” Behind the mask ” या
डॉ.सुभाष मुंजे या शल्यविशारदाने लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या श्यामला वनारसे यांनी
‘ बिहाइंड द मास्क ‘ याच नावाने केलेल्या अनुवादित व मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई प्रकाशित पुस्तकातून वेचलेला एक थक्क करणारा अनुभव – साभार )
गुरू कोणत्या रूपात प्रकट होईल हे सांगणे कठीण