फलटण दि.११ : आर्थिक गर्तेत रुतल्याने बंद पडलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना पूर्व वैभवाप्रत नेण्याच्या प्रयत्नात तालुक्यातील ऊस उत्पादक, सभासद, शेतकऱ्यांची साथ प्रेरणादायी ठरल्याने आपण त्यामध्ये यशस्वी झालो असून आता आपला हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून त्याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी केले आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या आणि श्रीराम जवाहर सहकारी साखर उद्योगाच्या १५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊसाची मोळी व गव्हाण पूजनाने आज (रविवार) मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. अध्यक्षस्थानी मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब होते, यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती’चे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), पंचायत समिती सभापती मा.श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर (बाबा), उपसभापती मा.सौ.रेखाताई खरात, श्रीराम’चे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे, व्हा.चेअरमन मा.श्री.नितीन भोसले व संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी सभासद, कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.सी.डी.तळेकर, उद्योगाचे प्रोजेक्ट मॅनेजर मा.श्री.मानसिंग पाटील व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
श्रीरामचे ज्येष्ठ संचालक मा.श्री.उत्तमराव चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी, चौधरवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच मा.सौ.प्रतिभा उत्तमराव चौधरी यांच्या शुभहस्ते कार्यक्रमापूर्वी विधीवत होम हवन करण्यात आले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी प्रास्ताविकात श्रीराम सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालविणाऱ्या श्रीराम जवाहर सहकारी साखर उद्योगाने यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून या हंगामात ५ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी श्रीरामला देऊन सहकार्य करावे, अशी विनंती केली.
फलटण तालुक्यात यावर्षी सुमारे ९ हजार हेक्टर क्षेत्रावर तुटणारा ऊस उभा असून त्यापैकी सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रातील सभासदांच्या आणि १५०० हेक्टर क्षेत्रातील गेटकेन ऊसाची नोंद आतापर्यंत श्रीराम’कडे झाली आहे, त्यामुळे ५ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट गाठणे सभासद व गेटकेन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने सहज शक्य असल्याचे नमूद करीत श्रीरामने एफआरपी प्रमाणे संपूर्ण पेमेंट यापूर्वी दिले असून यावर्षीही त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही देत संपूर्ण ऊस श्रीरामलाच देण्याचे आवाहन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी पुन्हा एकदा केले.
ऊस तोडणी वाहतुकी साठीही सक्षम यंत्रणा उभारण्यात आली असून त्यांचीही मागील सर्व देणी देऊन यावर्षीच्या हंगामासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचे अँडव्हान्स वाटप करण्यात आले असून २१८ ट्रक ट्रॅक्टर, ३१० अंगद आणि २३२ बैलगाडी ऊस वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असून त्याप्रमाणात तोडणी कोयते, मजूर उपलब्ध होणार असल्याचे निदर्शनास आणून देत नियमाप्रमाणे लागण तारखेनुसार ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले.