सातारा दि.28 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांलयांतील उपलब्ध बेडची माहिती 1077 या दूरध्वनीवर माहिती नागरिकांना मिळत होती. ही माहिती एका क्लिकवर मिळावी म्हणून लवकरच लिंक व वेबसाईटमार्फत उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना मिळेल. यामध्ये ऑक्सिजन व आयसीयु बेडची माहिती उपलब्ध होईल असे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी आपल्याकडे 300 ते 350 ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. साधारणत: पुढच्या आठवड्यापासून 1300 बेड उपलब्ध होतील तसेच आयसीयु बेडची संख्याही 70 ते 80 ने वाढेल. तथापि, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशन व्हावे, त्या संदर्भातील सूचना पूर्वीच प्रसिद्ध केल्या आहेत. अत्यंत आवश्यक असलयासच बेड उपलब्ध होतील. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी हॉस्पिटल बेडची मागणी करु नये अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
येत्या दोन दिवसांत रेमडेसिव्हर उपलब्ध होणार
जिल्ह्यातील रेमडेसिव्हर औषधाचा मोठासाठा क्वॉलिटी चेकींगमध्ये रिजेक्ट झाल्याने मागील काही दिवसांमध्ये राज्यात औषधाची कमतरता भासत होती. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व मी स्वत: याबाबत जातीनं लक्ष घालून येत्या एक – दोन दिवसांत रेमडेसिव्हर औषध कसे लवकरात लवकर उपलब्ध होतील याकडे लक्ष देणार आहोत. तसेच भविष्यकाळातही या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी : नागरिकांनी सहकार्य करावे
जिल्ह्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. हा टप्पा 10 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या मोहिमेअंतर्गत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शासकीय कर्मचारी हे घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. जेणे करून लवकरात लवकर लक्षणे असणाऱ्या बाधित रुग्णास वेळीच उपचार सुरु करुन मृत्यू दर कमी करता येईल. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या सेवकांना सहकार्य करावे. त्यानंतरही कोणाला कोरोना विषयक लक्षणे आढळल्यास किंवा तशी शंका आल्यास त्यांनी त्वरीत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना भेटण्याचे आवानही जिल्हाधिकारी यांनी केले.