फलटण : जि.प.प्राथ.शाळा मदनेनायकुडेवस्ती ( फलटण) येथील प्राथमिक शिक्षक धन्यकुमार प्रल्हाद तारळकर यांना राज्यस्तरीय कर्तुत्वान शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनी जाहीर झाला आहे.
लॉकडाऊन काळातील उल्लेखनीय कामामुळे,लॉकडाऊन काळात राज्यातील सर्व शिक्षक एकत्र येत राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ या नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षक मनापासून प्रयत्न करीत आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली आहे.
राज्यातील शिक्षकांमधून सात गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.
नंदुरबार येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. संदीप ज्ञानदेव मुळे आणि
नाशिक येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब गणपत बडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धा यशस्वितेसाठी राज्यातील सुमारे दोनशेपेक्षा जास्त शिक्षक प्रयत्नशील होते.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांना स्मरणचिन्ह आणि प्रमाणपत्र कुरिअरने पाठविण्यात आले आहे.
श्री. धन्यकुमार प्रल्हाद तारळकर, सातारा यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गटशिक्षणाधिकारी श्री. रमेश गंबरे, विस्ताराधिकारी अनिल संकपाळ, मठपती साहेब, केंद्रप्रमुख बन्याबा पारसे, सर्व शिक्षक वृंद, शा. व्य. अध्यक्ष व ग्रामस्थ या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.