जिंती येथे कृषी शिक्षण घेणाऱ्या कृषिकन्या कु. शितल शिवाजी रणवरे , सुमित गरुड व त्यांचे वडील राजेंद्र गरुड .यशस्वी शेळी पालनाच्या व्यवसायाची यशोगाथा..
फलटण : फलटण तालुक्यातील जिंती येथे कृषी महाविद्यालय पुणे मधील अंतिम वर्षात शिकणाऱ्या कृषीकन्या कु.शितल शिवाजी रणवरे यांनी कृषी औद्योगिक व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जिंती गावातील सुमित राजेंद्र गरुड यांच्या यशस्वी शेळी पालनाच्या व्यवसायाची यशोगाथा जाणून घेतली .
तसेच जिंती येथील सुमित गरुड हे अनेक बेरोजगार तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. शिक्षण घेऊनही सुमित यांनी नोकरीच्या मागे न धावता शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. सुमित यांच्या वडिलांची 30 एकर शेती आहे परंतु शेतीसोबतच काही तरी वेगळे करण्याची त्यांची धडपड सुरूच होती .दरम्यान त्यांनी २०११ मध्ये निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वडजल येथील ॲनिमल हसबंडरी या विभागाकडून शेळीपालना विषयी माहीती मिळवली.
त्यावेळी त्यांनी एक नर व एक मादी यांची खरेदी केली त्यासाठी त्यांना ९७ हजार रुपये खर्च आला. गरुड यांच्या कष्टामुळे सद्यस्थितीत शेळ्यांची संख्या ५६ वर गेली आहे यामध्ये १ नर ,३९ मादी व १६ लहान पिल्ले आहेत .ईद सारख्या सणांमध्ये या जातीच्या बोकडांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. साधारणपणे दीड हजार रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते. लॉक डाऊन मध्ये बोकडांची विक्री कमी झाली असली तरी या जातीच्या नराची पैदाशीसाठी फलटण, बारामती, पुणे सोबतच अनेक राज्यांमध्ये देखील मोठी मागणी असते.
तसेच सुमित गरुड यांनी गावातील अनेक तरुणांना शेळीपालना विषयी प्रोत्साहन दिले आहेत. या यशोगाथेचा आढावा घेण्यासाठी विषय तज्ञ डॉ. एच .पी सोनवणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.डी. सूर्यवंशी ,केंद्रप्रमुख डॉ.एस.एन. हसबनीस यांचे मार्गदर्शन लाभले.