फलटण : बदली हा शासकीय सेवेतील एक अविभाज्य भाग आहे. दर तीन वर्षांनी जिल्हा बदली होतच असते . सातारा जिल्ह्यातील तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे माझी बदली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर या ठिकाणी झाली असून मी प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण (सातारा ) या पदावरून सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी कार्यमुक्त होत आहे. गेल्या तीन वर्षात शिक्षण समृद्धी अंतर्गत जिल्हा संपादणूक सर्वेक्षण , अध्ययन स्तर निश्चिती, एस एम सी ची प्रभावी अंमल बजावणी, शिक्षण परिषदांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षकांचे व पर्यवेक्षीय यंत्रणेचे सक्षमीकरण या अंतर्गत विविध कार्यशाळा, आढावा बैठका, अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी विविध प्रकारचे अध्ययन साहित्य, मूल्यमापन साहित्य व प्रभावी असा कृति कार्यक्रम , शाळाबाह्य मुलांसाठी ऑनलाईन सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणणे, समावेशित शिक्षण अंतर्गत शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रगती साधने , शिक्षकांना व पर्यवेक्षीय यंत्रणेतील घटकांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी विविध कार्यशाळा, टवीनींग ऑफ स्कूल, शाळासिद्धी, डीआरजी , बीआरजी, आणि सीआरजी गटाचे सक्षमीकरण असे विविध उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविले गेले इथल्या एकेका शिक्षकाचे शैक्षणिक कार्य म्हणजे एकेक यशोगाथा आहे . अशा अनेक यशोगाथा पाहून आश्चर्य वाटते . प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रत्येक स्तरावरील उदा. एसएससी बोर्ड, एचएससी बोर्ड परीक्षा, शिष्यवृत्ती व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि कालीक चाचण्या अशा वेगवेगळ्या परीक्षातील उत्तुंग यश यासर्व बाबतीत राज्याच्या आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपला सातारा जिल्हा सतत प्रगती पथावर राहिला यासाठी सर्व शिक्षक , मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी , सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचे सोबत हे शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे कामकाज यशस्वी रित्या पुढे नेण्याची संधी लाभली. सर्वांचे खूप चांगले योगदान व उत्तम सहकार्य लाभले. गटसाधन केंद्रातील माझे सर्व सहकारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि तळमळीने आपले योगदान दिले, माझ्या डाएट कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उत्तम साथ लाभली. या जिल्ह्यातील माझ्या सर्व पत्रकार बांधवांनीही चांगल्या शैक्षणिक कार्याला भरघोस प्रसिद्धी दिली व इतरांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य केले . आमचा उत्साह वाढविला. जिल्ह्याचे यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कैलासजी शिंदेसाहेब व सद्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संजयजी भागवत साहेब यांचे प्रेरणादायी असे बहुमोल मार्गदर्शन लाभले . जिल्ह्यातील सर्व अध्यापक विद्यालयांचे प्राचार्य व संपूर्ण स्टाफ यांचे ही उत्तम सहकार्य लाभले. स्काऊट गाईड विभाग व इतर अनेक संस्था, संस्थाप्रमुख, मान्यवर पदाधिकारी यासर्वांचे उत्तम सहकार्य लाभले. मुथा फौंडेशन द्वारे मूल्यवर्धन कार्यक्रम प्रभावीपणा राबविला गेला.ग्यान प्रकाश फौंडेशनने गेल्या दोन वर्षात आम्हाला खूप चांगले शैक्षणिक सहकार्य केले. व एक शैक्षणिक चळवळ सुरु झाली. अलिकडे एलएफई टीम ही आम्हाला चांगला सपोर्ट देत आहे.आणि मला सांगायला अभिमान वाटतो की अत्यंत जिव्हाळ्याचं नातं ठेऊन ज्यांनी शिक्षण सक्षमीकरण आणि प्रशासन यामध्ये उत्तम समन्वय निर्माण केला ते शिक्षणाधिकारी आदरणीय प्रभावती कोळेकर , राजेशजी क्षीरसागर, देवीदास कुलाळ. आपल्या सर्वांच्या सोबत शै. कार्य करताना मला खूप आनंद मिळाला. जिल्ह्यातील हा उत्तम समन्वय, हा बंधुभाव, ही राज्यापुढे आणि देशापुढे आदर्श निर्माण करणारी संस्कृती यापुढेही अशीच रहावी व जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राची उत्तरोत्तर प्रगती होत रहावी हीच सदिच्छा. जरी थोड्याफार कालावधी साठी माझी बदली झाली असली तरी हा माझा जिल्हा आहे . माझ्या या तीन वर्षांच्या कार्यकालात मला आपणा कडून जे सहकार्य लाभले , बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि एक अतूट असं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं त्याबदल मी आपला अत्यंत ऋणी आहे. माझ्या या कार्य कालावधीत माझ्या कडून अनवधानाने अथवा अज्ञानाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांनी कृपया मला समजून घ्यावे ही विनंती आणि आपले सर्वांचे हे ऋणानुबंध कायमस्वरूपी असेच रहावेत ही नम्र विनंती.
डॉ. रामचंद्र कोरडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण (सातारा )