माझे कुटुंब..माझी जबाबदारी…अभियानाची पुस्तिका प्रकाशित करताना मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) व अन्य मान्यवर. (छाया : चंद्रकांत चिरमे)
तरडगाव, दि.१५ : कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला विळखा घातला असताना त्याला घाबरुन न जाता शासन, प्रशासन आणि लोकशक्तीच्या एकजुटीतून गेले ४/५ महिने आपण सर्वांनी दिलेला लढा निश्चित प्रेरणादायी असून रुग्ण संख्या वाढत असली तरी घाबरुन न जाता योग्य निदान व वैद्यकिय उपचाराद्वारे त्यावर मात करण्याचे आवाहन करतानाच त्यासाठी शासन आणि व्यक्तीगतरित्या मी स्वत: तुमच्या बरोबर आहे, योग्य काळजी घ्या, सुरक्षीत रहा, असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने दि.१५ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यभर माझे कुटुंब..माझी जबाबदारी…हे अभियान लोकांच्या साथीने राबविण्याचे ठरविले असून त्याचा फलटण तालुक्यातील शुभारंभ तरडगाव ता.फलटण येथील जिल्हा परिषद प्रा.आरोग्य केंद्रात मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आला. त्यावेळी मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, जिल्हा परिषद, सातारा मा.अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), पंचायत समिती उपसभापती, मा.सौ.रेखाताई खरात, सरपंच मा.सौ.जयश्रीताई चव्हाण, उपसरपंच मा.श्री.प्रदिप गायकवाड व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य, मा.सभापती मा.श्री.वसंतकाका गायकवाड, गटविकास अधिकारी मा.डॉ.सौ.अमिता गावडे-पवार, प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी मा.डॉ.अनिल कदम यांच्यासह तरडगाव व परिसरातील आजी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोना विषाणू विरुध्दच्या लढाईत प्रत्येक गावातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून पुढे येवून आपल्या गावात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, प्रशासन यंत्रणा, ग्रामपंचायत व स्थानिक समितीच्या माध्यमातून होणार असलेल्या आरोग्य सर्वेक्षणासाठी या स्वयंसेवकांनी प्रत्येक कुटुंबातील मधुमेह, रक्तदाब व अन्य आजार असलेले वृध्द, स्त्री, पुरुष यांची व्यवस्थीत नोंदणी व त्यांना योग्य उपचार होतील यासाठी पुढाकार घ्यावा, याकामी स्वयंसेवकांना तालुकास्तरावर आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा लाभ घेवून सक्षमपणे या कामात झोकून देवून काम करण्याचे आवाहन मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी युवकांना केले.
कोरोना आजार कोठून आला, त्याचा प्रादुर्भाव कसा वाढला या विषयी चर्चा करण्यापेक्षा त्याला गावागावात अटकाव करुन या तालुक्यातून किंबहुना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी तरुणांची मदत उपयुक्त ठरणार असल्याने याकामी प्रशिक्षण घेवून तरुण स्वयंसेवकांनी माझे कुटुंब..माझी जबाबदारी…हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन करतानाच तालुक्यात तरडगाव येथे पहिला कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तरडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका व केलेल्या उपाय योजनाबद्दल कौतुक करीत सदरचे अभियानही त्याच पध्दतीने यशस्वी करण्याची आवश्यकता मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी स्पष्टपणे नमुद केली.
मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब यांनी शासन, प्रशासन आणि संस्था, संघटनांच्या माध्यमातून मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या पुढाकाराने तालुकास्तरावर कोरोना उपचारासाठी उभारण्यात आलेल्या सक्षम यंत्रणेविषयी, तेथील वैद्यकिय साधने सुविधा विषयी सविस्तर माहिती देवून कोणत्याही परिस्थितीत या आजाराला न घाबरता संशयित स्थिती निर्माण होताच तातडीने तपासणी करुन घेण्याचे आवाहन मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब यांनी केले.
कोरोना आजार भयंकर असला तरी त्याला घाबरुन जाण्याने प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी लक्षणे दिसताच स्वतःहुन पुढे येवून चाचणी करुन घेणे व योग्य वैद्यकिय उपचारासाठी संबंधीत यंत्रणेशी संपर्क साधने आवश्यक आहे, त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य सामाजिक अंतर राखणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे यातून कोरोना नियंत्रणात ठेवणेच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ करावी, असे आवाहन मा.श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांनी केले.
प्रारंभी गटविकास अधिकारी मा.डॉ.सौ.अमिता गावडे-पवार यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.संतोष कुंभार यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली. मा.डॉ.अनिल कदम यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.