सातारा दि.15 (जिमाका):, कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम आजपासुन सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येणार असून कोरोना संसर्गापासून बचाव कसा करावा व आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती सांगण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम 15 सप्टेबर ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीचे वय, आरोग्याची परिस्थिती, ऑक्सीजन लेवल यांची तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी व गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवणे, जेवण करताना सुरक्षित अंतर ठेवणे या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेचा उपयोग होईल
– गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” मोहीमेचा आजपासून राज्यात शुभारंभ होत आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे या भावनेतून कोरोना संसर्गापासून बचाव कसा करावयाचा याबाबत गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे. मास्क वापरणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सतत हात धुणे, जिथे हात धुण्याची व्यवस्था नसेल अशा ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणे याची जागृती व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मी स्वत: अनेक घरांमध्ये जनजागृती करणार आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेचा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेंतर्गत जिल्या हतील 6 लाख 80 हजार कुटुंबांना देणार भेटी
– जिल्हाधिकारी शेखर सिंह
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर व 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्या ात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतर्गत जिल्ह्यातील 6 लाख 80 हजार कुटुंबाना पथक भेट देणार आहे. या टीममध्ये तीन जणांचा समावेश असून यांना कोरोना दूत म्हणून संबोधतण्यात येणार आहे. या पथकाकडून विचारण्यात येणारे प्रश्न हे सोपे असणार असून त्यांनी विचारलेलया प्रश्नांची खरी उत्तरे द्यावी. कोरोना संसर्गाबाबत जनजागृती व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. यामध्ये मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे याची जनजागृती करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे, हात वेळोवेळी धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे याची सवय लावावी.
या मोहिमेंतर्गत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याची सर्व माहिती मोहिमेंतर्गत सांगण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील युवक युवतींनी या मोहिमेत सहभागी होऊन एक सामाजिक दायीत्व म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
00000