फलटण : कोरोना विषाणू प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना केवळ शासन यंत्रणेवर विसंबून न राहता गट तट बाजूला ठेवून संपूर्ण गावाची एकजुट निर्माण करुन या संकटाशी मुकाबला करण्याची आवश्यकता व्यक्त करीत सामाजिक कामाची आवड असणारे गावातील तरुणांना स्वयंसेवक म्हणून बरोबर घेऊन पहिल्या टप्प्यात गावाचे सर्वेक्षण करण्याचे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी तालुक्यातील तरडगाव, हिंगणगाव व गिरवी या 3 जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आज ( सोमवार ) आणि उर्वरित साखरवाडी, विडणी , कोळकी, गुणवरे या 4 गटातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उद्या ( मंगळवार ) अनंत मंगल कार्यालय येथे बैठक घेऊन सूचना देण्याचे नियोजन करण्यात आले असून आजच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे बोलत होते, आ. दिपकराव चव्हाण , श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग सांभाळून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सर्व वैद्यकिय सेवा सुविधा मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यातुनच उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोरोना उपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. झिरपवाडी येथील बंद असलेल्या जुन्या ग्रामीण रुग्णालयात संसर्गजन्य आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय खाजगी भागिदारी तत्वावर सुरु करण्याच्या योजनेसह शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे शहर व तालुक्यात कोरोना उपचारासाठी आवश्यक साधने, सुविधा, औषधे शासन यंत्रणेमार्फत उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आणून देताना आपण प्रत्येकाने आपल्या गावाची जबाबदारी स्विकारुन यापुढे गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही त्याचबरोबर सध्या असलेल्या बाधीत रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य, मार्गदर्शन आणि मदत देण्यास आम्ही कोठेही कमी पडणार नाही याची ग्वाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली. गावातील ज्या वृध्द स्त्री पुरुषांना मधुमेह, रक्तदाब किंवा अन्य आजार आहेत.त्यांची माहिती या सर्वेक्षणादरम्यान संकलीत करुन त्यांच्यासाठी योग्य उपचाराची सुविधा घरीच उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येणार असून आज वाढत्या रुग्ण संख्येच्या प्रमाणात पुरेशा वैद्यकीय सुविधा प्रामुख्याने ऑक्सीजन सुविधेसह बेड उपलब्ध नसल्याने मोठी समस्या निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे बाधीत रुग्ण आढळणार नाहीत यादृष्टीने काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत त्यासाठी प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे ठरविले पाहिजे त्यातून रुग्णसंख्या मर्यादित ठेवणे शक्य असल्याचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. गावात एकाद्या विशिष्ट भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याभागात जनता कयूंचे आयोजन करुन तेथील रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट करतानाच माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत स्वयंसेवकांसमवेत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेवून प्रत्येक गावाचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याने संशयास्पद रुग्ण समोर येताच त्याला योग्य उपचाराद्वारे आजार वाढणार नाही,यासाठी योग्य खबरदारी घेतली जाणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले. गावातील स्वयंसेवी वृत्तीने काम करणाऱ्या तरुणांची यादी पंचायत समिती कार्यालयात उद्याच आणुन द्या, स्वयंसेवकांची संख्या किती आहे, ते कोणत्या गटाचे आहेत यापेक्षा त्यांना सामाजिक कार्याची प्रामुख्याने या सर्वेक्षणात सहभागी होवून गावातील कोरोना हटविण्याची आवड आहे त्यांना यामध्ये सहभागी करुन घेवून सदरची यादी तयार करा त्यासर्व स्वयंसेवकांना सर्वेक्षणाविषयी संबंधीत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खास प्रशिक्षण वर्गाद्वारे माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.