आसू (राहूल पवार )- फलटण तालुक्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने बाजरी व ऊस पीक भुईसपाट झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचे अगोदरचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात अजून भर म्हणून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावून शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
या पावसामुळे काढायला आलेल्या बाजरी पिकाचे नुकसान झाले असून बाजरीची कणसे भरल्यामुळे बाजरी पीक भुईसपाट होऊन बाजरी पिकात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केले जात आहे. बाजरी पिकाबरोबरच शेतात उभे असणारे कडवळाचे ऊसाचे पीक भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे आसू, पवारवाडी, शिंदेनगर ,गोखळी येथील शेतकऱ्यांनी सांगितले या झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
फलटण तालुक्यासह पूर्व भागातील शेतकरी या झालेल्या नुकसानीने चिंतेत पडला आहे. या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून हातातोंडाशी आलेले पीक पावसाने हिरावून घेतले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पावसामुळे काही भागातील शेतात पाणी साचले आहे तर काही भागातील ऊस बाजरी कडवळ या सारखी पिके भुईसपाट झाले आहेत. या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सर्व शेतकरी वर्गातून होत आहे.