फलटण दि.२७ : शिंगणापूर रोडवरील जुने विद्यार्थिनी वसतीगृहातील कोरोना वैद्यकीय उपचार केंद्र अधिक सक्षम करण्याबरोबर तेथे २४ तास डॉक्टर उपलब्ध असतील अशा पद्धतीने वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या ड्युटीचे नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना आज देण्यात आल्या आहेत.
कोरोना वाढता प्रादुर्भाव नियंत्रण आणि बाधीत रुग्णांवर योग्य उपचार याचा नियमीत आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीस मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले तर बैठकीस मा.आ.दिपकराव चव्हाण, इंसिडन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी मा.डॉ.शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार मा.श्री.रमेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री.तानाजी बरडे, नगर परिषद मुख्याधिकारी मा.श्री.प्रसाद काटकर, उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक मा.डॉ.व्यंकटेश धवन, मा.डॉ.सुभाष गायकवाड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.श्री.प्रताप पोमण, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.श्री.नितीन सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता मा.श्री.महेश नामदे, वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.राजेंद्र जगदाळे, अतिरिक्त गटविकास अधिकारी मा.श्री.उदमले उपस्थित होते.
शिंगणापूर कोरोना उपचार केंद्रात आवश्यक वैद्यकीय साधने/सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले असून एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला तातडीने अधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तातडीने दाखल करण्यासाठी योग्य व्यवस्था तातडीने करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात कोरोना उपचार केंद्र सुरु करुन तेथील १२ बेड साठी आवश्यक सर्व व्यवस्था तातडीने करुन आगामी २ दिवसात सदर केंद्र कार्यान्वित करावे, सर्व १२ बेडसाठी ऑक्सिजन सुविधा निर्माण करावी, १२ पैकी ५ बेड आयसीयु सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे संबंधीतांना यावेळी सांगण्यात आले.
संपूर्ण शहर व तालुक्यात सर्वेक्षण सुरु ठेवून संशयीत रुग्णाची योग्य दखल घेऊन त्यांना तातडीने कोरोना उपचार केंद्रात दाखल करावे, मधुमेह, रक्तदाब वगैरे आजार असणाऱ्या व्यक्तींच्या रॅपिड टेस्ट करुन घ्याव्यात, एकूणच बाधीतांची संख्या वाढणार नाही, यासाठी प्रबोधन आणि प्रसंगी मास्क वापर, गर्दी टाळणे, वयस्कर व्यक्ती व लहान मुलांचा घराबाहेर वावर यावर कायद्यातील तरतुदींचा वापर करावा लागला तरी करावा परंतु त्यावर नियम निकषांची अंमलबजावणी करण्याला प्राधान्य द्यावे असे सांगण्यात आले.