कु. सारिका काळे हिला मिळालेला पुरस्कार ही गौरव करणारी बाब : श्रीमंत संजीवराजे

फलटण, दि.२० : उस्मानाबाद येथील गुणवंत खो-खो खेळाडू कु.सारिका सुधाकर काळे यांना प्राप्त झालेला केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार ही खो-खो खेळाचा गौरव करणारी बाब असून सुमारे ३५ वर्षानंतर कु.सारिका काळे यांनी आपल्या खो-खो मधील नैपुण्याद्वारे अर्जुन पुरस्कार प्राप्त केला आहे. सन १९८९ मध्ये एन.शोभा या खो-खो खेळाडूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कु.सारिका काळे यांचे विशेष अभिनंदन महाराष्ट्र खो-खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

कु.सारिका काळे यांनी तिसर्‍या एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळताना सन २०१६ मध्ये इंदौर येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक प्राप्त करुन दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने खास बाब म्हणून त्यांचा विशेष गौरव करीत दि.५ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे तालुका क्रिडाधिकारी वर्ग २ या पदावर नियुक्ती दिली असून सध्या त्या तुळजापूर येथे तालुका क्रिडाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
कु.सारिका काळे यांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझ, डिसेंबर २००० मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, फेब्रुवारी २०१४ मध्ये गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सिल्व्हर, जानेवारी २०१५ मध्ये कर्नाटक, फेब्रुवारी २०१५ मध्ये केरळ, नोव्हेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र, जून २०१६ मध्ये ओरिसा, जानेवारी २०१७ मध्ये महाराष्ट्र, फेब्रुवारी २०१६ आसाम, सप्टेंबर २०१८ इंग्लंड, मार्च २०१९ राजस्थान येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. या गुणी खेळाडूला आतापर्यंत शिवछत्रपती, जानकी, राणी लक्ष्मीबाई या राज्यस्तरिय पुरस्कारासह जिल्हा व अन्य स्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून अशा या गुणी व गुणवंत खो-खो मधील निपूण खेळाडूस अर्जुन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपण महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि सातारा जिल्हा खो-खो असोसिएशनच्यावतीने विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
विविध खेळ प्रकारातील गुणवंत खेळाडूंना दिला जाणारा भारत सरकारचा, क्रिडा क्षेत्रातील हा सर्वोच्च अर्जुन पुरस्कार कु.सारिका काळे यांना भारतीय खो-खो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी केलेल्या शिफारशी तसेच कु.सारिका काळे यांच्या खो-खो मधील नैपुण्याचे योग्य मूल्यमापन होवून जाहीर करण्यात आल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलेे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी खो-खो खेळासाठी केलेले मार्गदर्शन आणि सततच्या सहकार्यामुळेच खो-खो हा देशी खेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून त्यामधून गुणवंत खेळाडू निर्माण झाले, या पुढेही होत राहतील याची ग्वाही देत खो-खो, कबड्डी वगैरे देशी खेळांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यासाठी खा.शरदचंद्रजी पवार व ना.अजितदादा पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शन कारणीभूत असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
अर्जुन पुरस्काराबद्दल कु.सारिका काळे यांचे मार्गदर्शक व भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा.डॉ.चंद्रजित जाधव व कु.सारिका काळे यांचे खा.शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, आ.दिपकराव चव्हाण, खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशुजी मित्तल, महासचिव महेंद्रसिंगजी त्यागी व सर्व पदाधिकारी, भारतीय ऑलिम्पिक संघटना सेक्रेटरी राजीवजी मेहता, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा खो-खो असोसिएशन उपाध्यक्ष शामराव आष्टेकर, बाळासाहेब भिलारे, मा.खजिनदार अ‍ॅड.रमेशचंद्र भोसले, खजिनदार अनिल शिंदे, सचिव महेंद्र गाढवे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!