सातारा दि. 19 (जिमाका) : खटाव तालुक्यातील मायणी, कानकात्रेवाडी व येरळवाडी येथील तलाव व सुर्याचीवाडी येथील पाझर तलाव हा स्थानिक व स्थलांतरित पक्षी यांच्याकरिता वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३६ (अ) अन्वये मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो मंजूरीसाठी शासनाकडे सादर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वडूज, एस. एन. फुंदे यांनी दिली.
आज मायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान येथे डॉ.क्लेमेंट वन मुख्य वनसरंक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर वनवृत्त कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपस्थित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी यांनी हे क्षेत्र मायणी समुह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत सहमती दर्शविली.
या सभेस डॉ.भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा, श्री.सागर गवते विभागीय वनाधिकारी (दक्षता) कोल्हापूर, श्री.संजीवन चव्हाण सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा, सौ.शितल पुंदे वनक्षेत्रपाल वडूज, श्री.सुनिल भोईटे मानद वन्यजीवरक्षक, वनकर्मचारी तसेच मायणी परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.