फलटण दि. 18 : फलटण शहर व परिसरातील किंबहुना पर्यटकांना आकर्षीत करेल अशा अत्यंत सुंदर, देखण्या, सर्व वयोगटातील नागरिकांना दिलासा देणार्या फलटण येथील वन उद्यानाचे उदघाटन राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन केले असून फलटण करांना आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
फलटण शहराच्या पश्चिम भागात विमानतळानजिक, वन खात्याच्या 4.28 हेक्टर क्षेत्रावर सन 2011 पासून आज अखेर 2 कोटी रुपयांहुन अधिक खर्च करुन वन विभागाने सदर आकर्षक व उपयुक्त उद्यानाची उभारणी केली असून कमिन्स इंडिया फौंडेशनच्या माध्यमातून आगामी काळात त्याची देखभाल व विस्तार करण्यात येणार आहे.
फलटण शहर व तालुक्याचा वाढता औद्योगिक, कृषी, व्यापार, शैक्षणिक विकास लक्षात घेऊन येथे वाढणार्या विविध क्षेत्रातील लोकवस्तीला आवश्यक नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न असून त्याचाच एक भाग म्हणून शहरवासीयांना कमिन्स फौंडेशन आणि राज्याच्या वन विभागाच्या माध्यमातून एक दर्जेदार, उत्तम बाग बगीचा उपलब्ध झाल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या वन उद्यानात झाडांच्या स्थानिक प्रजाती, वनौषधी, निसर्ग माहिती केंद्र, लहान मुलांसाठी बालोद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी पद पथ (Walking Trac) विविध प्रकारचे लॉन्स, उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत कमिन्स इंडिया फौंडेशनने सदर वन उद्यान चालविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता आणि तो मंजूर करण्याची सूचना महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करुन आज सदर उद्यान फलटण करांसाठी उपलब्ध करुन दिले असल्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी निदर्शनास आणून दिले.
मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, त्याचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य असल्याचे नमूद करीत फलटण येथील या वन उद्यानात वड, पिंपळ, कडुनिंब, तुळस आदी मानवाला 24 तास ऑक्सिजन देणार्या, पर्यावरण संरक्षणासाठी वरदान ठरणार्या वृक्षांसह अन्य फुले व मनोहारी वृक्षांची लागवड केली असल्याचे नमूद करीत पर्यावरण संरक्षणासाठी वन विभाग कसोशीने प्रयत्नशील आहे त्यामध्ये नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले.
कमिन्स फौंडेशनप्रमाणे अन्य संस्थांनी पर्यावरण संरक्षणासाठी पुढे यावे, या कंपन्यांनी आपल्या सीएसआर फ़ंडातून वन विभागाला आर्थिक सहकार्य केले तर या क्षेत्रात आणखी नवीन उपक्रम राबविता येतील असे सांगून फलटणचे हे वन उद्यान नियमानुसार चालविण्याची आवश्यकता वन मंत्र्यांनी स्पष्ट केली.
फलटण येथील या वन उद्यानात नक्षत्र वन, राशीवन, बालोद्यान, अतिथीवन, फ्लॉवर गार्डन, अमेरिकन लॉन आदी विविध विभाग आणि तेथील आकर्षक रचना निश्चित पर्यटकांना आकर्षित करणारी आहे, तथापी गेल्या 3/4 महिन्याच्या कालावधीत या वन उद्यानाची नियमीत देखभाल, स्वच्छता व अन्य कामे झाली नसल्याने कमिन्स फौंडेशनच्या माध्यमातून दुरुस्ती देखभालीचे काम फौंडेशनच्या वरिष्ठ अधिकारी संगीता गुप्ते त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून गतिमान करण्यात आले असून आगामी काळात सर्वांसाठी एक उत्तम वन उद्यान उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
फलटण येथील या वन उद्यानाच्या ऑनलाइन उदघाटन सोहळ्यास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, वन मंत्री संजय राठोड, महाराष्ट्र खो खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. रामबाबू, मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंटबेन कोल्हापूर, सातारा वनविभागाचे उपवन संरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक सातारा संजीवन चव्हाण, फलटणचे वनक्षेत्रपाल मारुती निकम, यवतमाळ वन विभागाचे वन संरक्षक निकम, यवतमाळचे उप वन संरक्षक केशव वाबळे, पुसदचे उप वन संरक्षक अशोक सोनकुसरे उपस्थित होते.
Post Views: 27