सातारा दि. 14 (जि. मा. का) : प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना’ अशा आशयाची पोस्ट सध्या समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात असून त्याद्वारे शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना’ अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही किंवा याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे.
सन २०२०-२१ अंतर्गत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनांतर्गत ट्रॅक्टर साठी अनुदान अनुज्ञेय आहे. यासाठी शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवरअर्ज स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जेष्ठता क्रमवारी निश्चित करून उपलब्ध निधीच्या प्रमाणात पूर्वसंमती देण्यात येणार आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.
कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाचे संदर्भात दि. १४ जुले २० २० चे शासन निर्णयानुसार ट्रॅक्टर साठी अनुदानाचे दर घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार अनु. जाती, अनु. जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना किमतीच्या ५० टक्के किंवा रु. १.२५ लाख यापैकी कमी असेल ते
आणि इतर शेतकऱ्यांना किमतीच्या ४० टक्के किंवा रु.१ लाख यापैकी कमी असेल याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाचे अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. शासनाकडून वित्तीय मान्यता प्राप्त होताच तालुकानिहाय लक्षांक कळविण्यात येतील.