बारामती:
भारतीय सैन्य दलामध्ये महिलांसाठी सोल्जर ‘जनरल ड्युटी’ किंवा ‘वुमेन मिलीटरी पोलीस’ या पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय सैन्य दलामध्ये 10 वी व 12 वी झालेल्या मुलांसाठी दर वर्षी भारतीय सैन्य दलात सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क, सोल्जर नर्सिंग असिस्टंट, ट्रेड्समॅन आदि पदांसाठी दर वर्षी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाते परंतु या भरती प्रक्रियेमध्ये महिलांना सहभागी होता येत नव्हते. या वर्षी पहिल्यांदाच महिलांसाठी सोल्जर जनरल ड्युटी पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत 27 जुलै पासून 31 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याआधी ॲडमिट कार्डवर उमेदवाराला भरतीचे ठिकाण, दिनांक, कागदपत्रे इ. बाबत सर्व माहिती उपलब्ध होईल. या भरतीसाठी महिला उमेदवारांचे वय साडे सतरा ते एकविस वर्षे, उंची 152 सेमी. तर वजन उंची व वयाच्या प्रमाणात असावे तसेच शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावे व 10 वी मध्ये किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे. जर या भरतीसाठी अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात आली तर 10 वी मधील गुणांच्या आधारे काही प्रमाणात उमेदवारांची निवड पुढील प्रक्रियेसाठी केली जाईल. या भरतीसाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये 7 मिनीटे व 30 सेकंदात 1600 मीटर धावणे आहे. त्याचबरोबर लांब उडी व उंच उडी हेही प्रकार आहेत पण यामध्ये फक्त पात्र होणे आवश्यक आहे. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये डोळे, कान, नाक, टॅटु इ. बाबींची तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांनी मैदानी चाचणी व वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्यानंतर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी निगेटीव्ह मार्कींग असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी सैनिक व माजी सैनिकांच्या मुली, विधवा पत्नी यांना 20 गुण बोनस दिले जाणार आहेत. त्याचबरोबर एन. सी. सी. प्रमाणपत्र धारक मुली व खेळाडू यांनाही बोनस गुणांची तरतुद केलेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे ॲडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, जात व धर्म प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र आदि कागदपत्र असणे आवश्यक आहे. याबाबत बोलताना सह्याद्री करिअर अकॅडमी, बारामती चे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, ‘भारतीय सैन्य दलांमध्ये मुलींसाठी पहिल्यांदाच अशी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे त्यातील पात्रता, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, बोनस गुण व इतर बाराकावे जाणून घेतल्यास यामध्ये मुलींना सहज भरती होता येईल.’
फक्त या भरती साठी ग्रामीण व शहरी भागातील पात्र महिला व मुलींनी भरती साठी मोफत मार्गदर्शन सह्याद्री अकॅडमी च्या वतीने करण्यात येणार आहे.