ऑक्सिजन मशीन
बारामती : कोरोना रुग्णाला उपयुक्त ठरणार व
महत्वाच्या ठरणाऱ्या तीन हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीन्स आज रुई येथे कार्यान्वित करण्यात आल्या. बारामतीतील रुई रुग्णालयाच कोविड हेल्थ सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी ज्या रुग्णांना दाखल करण्यात येते, त्यापैकी काहींना जर ऑक्सिजनची गरज भासली, तर या हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीनचा वापर केला जाणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारा लाख रुपये या तीन मशीन्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत. ज्या रुग्णांना मास्कच्या ऑक्सिजन यंत्रणेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हाय फ्लो नेझल मशीन उपयुक्त ठरणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
दरम्यान, एमआयडीसीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या तीन इमारती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अधिग्रहीत केल्या आहेत. या एका वसतिगृहात 54 व्यक्ती राहू शकतात. तीन इमारती मिळून या ठिकाणी 162 रुग्ण राहू शकतील. या पध्दतीने ज्यांना लक्षणे नाहीत, मात्र जे पॉझिटिव्ह आहेत असे, त्याच प्रमाणे ज्यांच्या घशातील द्रावाचे नमुने घेतले जातील, त्यांनाही रिपोर्ट येईपर्यंत याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता बारामतीकरांचीही उत्तम सोय येथे होणार आहे.