पुणे : काव्यरचना ही एक अंतर्भूत कला आहे. प्रत्येक साहित्यिकाची काव्य मांडणी करणे ही एक वेगळी शैली असल्याचे पाहण्यास मिळते. अशी काव्य शैली रसिकांना भुरळ घालते. नवजीवनाला संजीवनी देऊन आकार देते.काव्य वाचण्यास भाग पाडते. त्यासाठी नवोदित कवींनी काव्याचा इतिहास माहिती करून अभ्यासावा. उत्कृष्ट काव्यरचना हा काव्यप्रतिभेचा भाग आहे, छाया जावळे यांची काव्यरचना आशय घन असून उत्तम व साजेशी आहे,असे प्रतिपादन मराठी शिलेदार समूह, महाराष्ट्र राज्याचे प्रशासक राहुल पाटील यांनी केले.
‘काव्यदर्पण’ काव्यसंग्रह व श्रावणातील पाऊस या विशेषांकाचे प्रकाशन ऑनलाइन सोहळा दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी मिलिंद पाटील आर, जे रेडिओ नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी शिलेदार समूहाचे प्रशासक राहुल पाटील यांनी केले.प्रास्ताविक व मनोगतीय भाषणात त्यांनी मराठी भाषेची श्रीमंती जोपासण्यासाठी कसे एकनिष्ठ राहू याबद्दल मार्गदर्शन केले,व छाया जावळे यांच्या काव्यदर्पण या काव्यसंग्रहाचे कौतुक करत लेखनास शुभेच्छा देऊन त्यांचे विषेश अभिनंदन केले.
काव्यदर्पण काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बबन नाखले यांनी केले.याप्रसंगी संदीप जावळे व प्रतिभावंत साहित्यिक व काव्य दर्पण च्या कवी छाया जावळे यांचा सत्कार देखील करण्यात आला.
“काव्यदर्पण” या काव्यसंग्रहाला “झी” मराठी’ वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे सुप्रसिद्ध पटकथा संवादलेखक प्रतापराव गंगावणे यांची प्रस्तावना लाभलेली आहे.तसेच काव्यसंग्रहात स्त्री भ्रूण हत्या,लैंगिक शोषण,शेतकऱ्यांच्या समस्या, जातीभेद, राजकारण, अतिवृष्टी, दुष्काळ, प्रेम यासारख्या विविधांगी विषयांच्या रचना संग्रहात उत्तम प्रकारे काव्यबद्ध केल्या आहेत.
कवयित्रीने आपल्या मनोगतात मराठी भाषेच्या सक्षमीकरणाचा हा वसा अविरत जपण्याचा मानस व्यक्त केला, व कवितेच्या माध्यमातून अशीच सामाजिक जनजागृती करण्याची इच्छा ही व्यक्त केली.
काव्यसंग्रहासाठी लाभलेल्या श्रेयनामावलीमध्ये त्यांनी प्रामुख्याने त्यांच्या पतीची खंबीर साथ मिळाल्याचे नमूद केले.मराठी शिलेदार समूहाचे प्रशासक राहुल पाटील यांचीही वेळोवेळी मदत झाली,त्याचप्रमाणे संजय गायकवाड, प्रीतम सोनवणे, विष्णू संकपाळ,किरण शिंदे, अमोल गळंगे,दयानंद मस्के,व्यास वरे यांच्या सतत प्रेरणादायी शुभेच्छा लाभल्या असेही त्या म्हणाल्या.सदरच्या कार्यक्रमात ‘साहित्य सेवा सन्मान’हा पुरस्कार राज्यातील विविध प्रांतातील ५५ कवी,कवयित्रींना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविताताई पाटील यांनी केले, तर आभार वैशाली ताई अंड्रस्कर यांनी मानले.
ऑनलाइन प्रकाशनासाठी राज्यातील विविध भागांतील कवी, कवयित्री, लेखक आवर्जून उपस्थित होते