आपचे नूतन जिल्हाध्यक्ष संदिप जगताप यांचा रोप देवून सत्कार करताना प.महाराष्ट्र खजिनदार सागर भोगावकर, यावेळी महेंद्र बाचल, विजकुमार धोतमल व आपचे विविध पदाधिकारी.
सातारा: आम आदमी पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संदिप जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर आपचे राज्याध्यक्ष रंगा राचुरे, राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगावकर यांनी दिली.
आपच्या जिल्हा कार्यकारणीच्या जिल्हाध्यक्षपदी संदिप विठ्ठल जगताप यांची तर उपाध्यक्षपदी मधुकर चंदर माने, अॅड. इम्तियाज दिलावर खान, सचिवपदी महेंद्र दत्तात्रय बाचल, सहसचिवपदी उत्तम ज्ञानू सावंत, खजिनदारपदी विजय कुमार लक्ष्मण धोतमल, सहखजिनदारपदी संजय बाळासाहेब भोसले, माध्यम प्रमुख: आसिफ तय्यब खान पठाण, माध्यम उपप्रमुख दयानंद हरिभाऊ माने, ज्येष्ठ सल्लागारपदी चंद्रशेखर मधुकर चोरगे आदी पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी नूतन पदाधिकार्यांचा रोप देवून पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगावकर यांनी सत्कार केला.
दरम्यान, नूतन पदाधिकार्यांना आपच्या सातारा कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत पार पडलेल्या या निवड प्रक्रियेदरम्यान नूतन पदाधिकार्यांनी आम आदमी पार्टीला जिल्ह्यात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण देशाला आदर्शवत ठरणार्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. दिल्ली सरकार प्रमाणे मोफत वीज, मोफत पाणी, सरकारी शाळातील सुधारणा, उत्तम आरोग्य सेवा आदी प्रश्नांबाबत सातारा जिल्ह्यातही आवाज उठवला जाईल. तसेच पक्षाची ध्येय धोरणे डोळयांसमोर ठेवून भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करून लोक शिक्षण व लोक जागृतीचे काम करणार आहोत असेही नूतन पदाधिकार्यांनी सांगितले.
गाव तेथे पक्षाची शाखा निर्माण करून तालुका स्तरिय संघटना निवडीचे प्रक्रिया सुरू आहे. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात रुजवणार आहे. तसेच घटनेतील मूलभूत गरजा सर्व सामान्य लोकांना विनासायास मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. संघटनेचे येणार्या काळात बूथ स्तरावरील संगठन निर्माण करून कार्यकर्त्यांचे जाळे तयार करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगर पालिका व महानगर पालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे.
नूतन जिल्हा कार्याकारणी पदाधिकार्यांना आम आदमी पार्टी महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे, सचिव धनंजय शिंदे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संयोजक संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव वशिम मुल्ला, पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगावकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.