बारामती: डॉक्टर दाम्पत्याची भामट्या कडून फसवणूक झाली असल्याची घटना नुकतीच घडली
पेटीएम अॅपची केवायसी अपूर्ण असल्याचे सांगत बारामतीतील एका डॉक्टरांकडून ओटीपी क्रमांक घेत त्यांचे सुमारे ३ लाख ३२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी राकेश मल्होत्रा नामक एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील डॉ. महेंद्र रमणलाल दोशी (वय ६७) यांनी याबाबत फिर्याद दिली. दोशी यांचे शहरात रमण हॉस्पिटल आहे. त्यांची अॅक्सिस बँक व आयसीआयसीआय बँकेत खाती आहेत. अॅक्सिस बँकेत पती-पत्नीच्या नावे सलग्न खाते आहे. आयसीआयसीआय बँकेच्या खात्याद्वारे ते पेटीएम अॅप वापरतात. दि. २९ जुलै रोजी त्यांच्या बँकेकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलवर ९६४११७८५११ या क्रमांकावरून फोन आला. मोबाईलधारकाने त्याचे नाव राकेश मल्होत्रा असे सांगत पेटीएम अॅप कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पेटीएमची केवायसी पेपर अपूर्ण आहेत. त्यामुळे पुढील २४ तासात ते बंद होईल. हे अॅप चालू ठेवण्यासाठी, केवायसी पूर्ण करण्यासाठी मी सांगतो त्याप्रमाणे करा, असे त्याने सांगितले.
त्यानुसार गुगल प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. या अॅपमध्ये आलेला आयडी क्रमांक त्याने विचारून घेतला. केवायसी अपलोड करण्यासाठी दोशी यांना सात रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी ही रक्कम भरल्यानंतर अॅक्सिस बँकेतून तुम्हाला कॉल येईल त्यांना ओटीपी द्या, असे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच ९१२२६००४७७०० या क्रमांकावरून दोशी यांना कॉल आला. ओटीपीची मागणी करण्यात आली. त्यांनी तो दिल्यानंतर लागलीच त्यांच्या व पत्नीच्या खात्यातून पाच ट्रान्झेक्शनद्वारे ३ लाख ३२ हजार रुपये परस्पर कपात करत त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. केवळ सात ते आठ मिनिटातच ही घटना घडली. रक्कम कपात झाल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर डॉ. दोशी यांनी तात्काळ बँकेत जात खाते उतारा घेतला. तुमची आर्थिक फसवणूक झाली आहे, तुम्ही पोलिस तक्रार द्या, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार फिर्य़ाद दाखल करण्यात आली.