आसू : लॉकडाऊन मध्ये कर्जाचे हप्ते भरण्यासाठी शिथिलता आणली असताना फलटण पूर्व भागामध्ये फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी जबरदस्तीने कर्जाचा हप्ता वसूल करण्यासाठी सर्वसामान्य कर्जदारांच्या मागे तगादा लावत असल्याने नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.
लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व व्यवहार ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या परिस्थितीवर मात करत लॉकडाउनच्या कालावधी अगोदरच बँकेकडून तसेच फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन दोन चाकी वाहनांची तसेच इलेट्रॉनिक वस्तूची खरेदी केली असून लॉकडाऊन मध्ये सर्व व्यवहार ठप्प झाल्याने घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. शासनस्तरावर कर्जाच्या हप्ते सद्यस्थितीत न भरण्यासाठी आदेश देऊनही फायनान्स कंपन्यांना या सर्व गोष्टी माहीत असताना देखील काही फायनान्स कंपन्यांनी भ्रमणध्वनी व एसएमएस’द्वारे तसेच कर्जदाराच्या घरी जाऊन वसुलीचा तगादा लावल्याने सर्वच कर्जदार हैराण झाले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे यामध्ये फायनान्स कंपन्या कर्जदारांच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. या कर्जाचे हप्ते भरायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामध्ये शासनाने लक्ष घालावे व फायनान्स कंपन्यांना समज द्यावी अशी मागणी फलटण तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. त्याचबरोबर फायनान्स कंपनी कडून होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी सर्वसामान्य कर्जदार करत आहेत.
हप्त्याची अडचण, त्यात वाहन ओढून नेहण्याची दाखवली जातेय भीती
” लॉकडाउनच्या कालावधीमध्ये आर्थिक परिस्थिती नसल्याने हप्ते भरण्याचे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामध्ये फायनान्स कंपनी हप्ता भरण्याचा तगादा लावला आहे व हप्ता वेळेत न भरल्यास दंड करण्याची व वाहन ओडुन नेण्याची भीती दाखवत आहेत या भीतीमुळे सर्वसामान्य कर्जदार त्रस्त झाले आहेत.”