सातारा दि. 31 (जि. मा. का) : ऊस पानांच्या खालच्या बाजूस मावा आढळतो.पंखी माव्याची मादी काळसर,तर विनपंखी माव्याची मादी पांढरट दिसते, म्हणून त्यास पांढरा लोकरी मावा म्हणतात.या किडीचा प्रसार वारा, मुंग्या, किडग्रस्त पाने किंवा बेणे याद्वारे होतो. मादीच्या पोटातुन नुकतीच बाहेर पडलेली बाल्यावस्थेतील पिल्ले ही पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असून अतिशय चपळअसतात.
पानांच्या खालच्या बाजूस मध्य शिरेच्या बाजुना लोकरी माव्याची पिल्ले दाटीवाटीने एकमेकाच्या अंगावर बसलेली दिसतात.बाल्यावस्थेमध्ये चारवेळा कात टाकली जाते. तिस-या अवस्थेपासून किडीच्या पाठीवर पांढ-या लोकरी सारखे तंतू दिसून येतात.लोकरी माव्याचे प्रोढ हे काळे असुन पारदर्शक पंखाच्या दोन जोडया असतात.
नुकसानीचा प्रकार : या किडीची पिल्ले व प्रौढ पानाखाली स्थिर राहुन अणकुचीदार सोंडेच्या साहाय्याने पानातील अन्नरस शोषण करतात. किडग्रस्त पानाच्या मुख्य शिरेच्या दोन्ही बाजुला व पानावर पिवळसर ठिपके दिसतात. पानाच्या कडा सुकतात व पाने कोरडी पडून वाळतात.त्यामुळे ऊस कमकुवत होतो. वाढ खुंटते परिणा ऊस उत्पादन व साखर उता-यामध्ये लक्षणीय घट होते. लोकरी माव्याच्या शरीरातुन बाहेर टाकलेल्या मधासारखा चिकट द्रवामुळे पानावर काळया रंगाच्या परोपजीवी बुरशीची वाढ होते. संपूर्ण पान
काळे पडल्याने त्यांची अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते.
अनुकुल वातावरण : ढगाळ हवामान, 70ते 95 टक्के सापेक्ष आर्द्रता असे हवामान लोकरी माव्यासाठी अनुकूल आहे. प्रादुर्भावजुन पासून वाढत जाऊन सप्टेंबरमध्ये सर्वात जास्त असतो.
नियंत्रण उपाय :
अ) मशागतीचे उपाय
१.ऊस लागण पट्टा किंवा रूंद सरी पध्दतीने करावी.
२.सुरूवातीस पानावर लोकरी मावा आढळल्यास ती पाने काढून जाळून टाकावीत.
३.ऊस पिकासाठी पाण्याचा जास्त प्रमाणात वापर टाळावा.आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
४.शिफारशीनुसार संतुलित रासायनिक खताचा वापर करावा. नत्रयुक्त खतांच्या जास्त मात्रा देवू नयेत.नत्राचा गरजेपेक्षा जास्त वापर हा लोकरी माव्यास आमंत्रण देतो. शेणखत व गांडूळखत 20 टन प्रति हेक्टरी वापरावे.
ब) जैविक उपाय
१. लेडी बर्ड बीटल, सिरफीड माशी, डिफा (कोनोबाथ्रा),मायक्रोमस इरोरॅप्स व क्रायसोपर्ला करर्निया या परभक्षी मित्रकिटकाची जोपासना करावी.
२. कोनोबाथ्रा अॅफिडीव्होरा 1000अळया किंवा मायक्रोमस 2500 अळया किंवा क्रायसोपर्ला करर्निया या मित्रकिटकाची 2500
अंडी प्रति हेक्टरी सोडाव्यात.
३. मित्रकिटक सोडल्यानंतर 3ते 4 आठवडे किटकनाशकांची फवारणी करू नये.
क) रासायनिक उपाय
२.ऊस लागण करताना 10 लिटर पाण्यात डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 26.5 मिली घेऊन 10मिनिटे बीजप्रक्रिया करावी.
२.परभक्षक मित्रकिटकाची वाढ झाली नाही व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल अशा क्षेत्रामध्ये पिकाची अवस्था लहान
असताना किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 50 टक्के अधिक सायपरमेथ्रीन 5 टक्के ईसी 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३. पिकास ठिबक सुविधा उपलब्ध असल्यास थायोमेथोक्झाम 20 टक्के डब्ल्युजी 500 ग्रॅम प्रनि एकर ठिंबकद्वारे दयावे.
४. ऊस पीक सहा महिन्याचे होईपर्यंत थायमेट 10 टक्के जमिनीतुन वापरावे.
५. फिप्रोनिल 0.3 टक्के दाणेदार 25ते 33 किलो प्रति हेक्टर ऊसामध्ये टाकावे.