फलटण – लूटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात फलटण पोलीसांना यश आले असून त्या मधील चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून एक चोर फरार झाला आहे.
या बाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातुन दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. २५ जुलै रोजी रात्र गस्ती करिता असलेले पोलीस नाईक नितीन भोसले व चालक अमृत करपे, होमगार्ड काळोखे हे गस्त करीत असताना गोविंद डेअरी च्या पुढे पंढरपूर रोड येथे काही तरुण एक चार चाकी गाडीची नंबर प्लेट बदली करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांचा संशय आल्याने गाडी थांबवली असता सदरचे इसम हे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी लगेचच पिसीआर मोबाईल बोलावून सदर गाडीचा पाठलाग करून चार चाकी गाडी पोलीसांनी ताब्यात घेतली.
यावेळी पोलीसाना त्यांच्यासोबत आणखी दोन मोटारसायकली असल्याचे निदर्शनास आले त्यांना देखील पोलीसांनी लगेचच ताब्यात घेतले. यावेळी अभिमान अर्जुन खिलारे २३ रा. मोरोची
ता.माळशिरस जि.सोलापूर, सागर भारत माने २२ रा. सुळेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर,राजकुमार किसन खिलारे २० रा. मोरोची ता.माळशिरस जि.सोलापूर, सुरज संपत भिलारे २४ रा. रा.कर्नवाडी ता. भोर जि. पुणे यांना अटक करण्यात आली रमन अडागळे रा.मोरोची ता. माळशिरस सोलापूर हा पळून जाण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेण्यात आलेल्या चार तरुणांकडे २ धारधार सुरे मिळून आले. सदर आरोपी हे लुटमार करण्याच्या तयारीत असताना मिळून आलेले असल्याने पाच जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आला आहे.
या आरोपीच्या वर यापुर्वीचे गुन्हयाचे रेकाॅर्ड असून त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस करुन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे फलटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रावळ, पोलीस नाईक नितीन भोसले, पो.हवा.खाडे, धापते, अच्युत जगताप व पो.काॅ. सांडगे यांनी केली आहे.