गायीच्या दुधाला सरसकट अनुदान द्यावे भाजप महायुतीचे फलटणमध्ये आंदोलन; खासदार रणजितसिंह यांचे निवेदन

 

फलटण : गायीच्या दुधाला सरसकट 10 रुपये प्रतिलिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो 50 रु. अनुदान द्यावे, अशी मागणी करत भाजप व महायुतीच्या वतीने सोमवारी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. फलटण येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. व प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना मागण्यांचे निवेदन ही देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकर्‍यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकर्‍यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकर्‍यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटातच दुधाचे भावही कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये 1 कोटी 40 लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी 35 लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. 90 लाख लिटर दुध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. 15 लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवतो. शासकीय योजनेद्वारे फक्त 1 लाख लिटर दुध खरेदी केले जाते.
या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दूध 15 ते 16 रु. दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दुध 25 रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात 7 लाख लिटर दुध खरेदी केले जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकर्‍यांना व दुध उत्पादकांना शासनाने वार्‍यावर सोडले आहे. 
तसेच ,गायीच्या दुधाला प्रती लिटर 10 रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो 50 रु अनुदान, शासनाकडून 30 रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता सर्व शेतकरी 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हणले आहे. 
या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री ना. सुनील केदार मंत्री, क्रिडा व युवक, महाराष्ट्र राज्य,यांना माहिती आणि कार्यवाही साठी पाठवण्यात आली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!