फलटण :- येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून कार्यलयीन वेळेत मुख्य दरवाजाला कुलूप लावून फक्त एजंट व मर्जीतील लोकांना कार्यालयात प्रेवेश दिला जात असून सामान्य जनतेला बाहेरूनच पिटाळून लावले जात असल्याने भुमि अभिलेख कार्यालयाच्या एकंदरीतच सुरू असलेल्या मनमानी कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
फलटण भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला
भूमी अभिलेख फलटण येथील कार्यालयांच्या मुख्य दरवाजाला आतून लावण्यात आलेले कुलूप
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेली तीन ते चार महिन्यांपासून कोरोना आजाराने सर्वत्र पाय पसरले असून सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आली होती परंतु गेली काही दिवसापासून शासकीय कार्यालये सुरू करून कामकाज सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते यानंतर सर्व कार्यालये सुरू करण्यात आली होती. यानंतर नागरिकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त केली जात होती. शासनाच्या आदेशानंतर फलटण भूमी अभिलेख हे कार्यालय सुरू करण्यात आले होते परंतु हे कार्यालय सुरू झाल्यापासून कार्यालयाच्या मुख्य लोखंडी दरवाजाला कार्यालयीन वेळेत सकाळी ते सायंकाळी अखेर आतून कुलूप लावण्यात येत असून येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला जात नसून नागरिकांना आदेशाची भीती दाखवून बाहेरूनच पिटाळून लावले जात आहे.
तसेच या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोजणी व इतर कामकाजाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही अथवा कार्यालयाशी संबधित घेऊन आलेले काम केले जात नसल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. या कार्यालयात एजंट व खास मर्जीतील खास लोकांनाच दिवसभर कार्यालयात कुलूप उघडून प्रवेश दिला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.तसेच मुख्य दरवाज्याच्या ठिकाणी एक लाकडी स्टूल ठेवला असून या स्टूलवरती एक पुठ्याचा बॉक्स ठेवला असून नागरिकांना अर्जाची पोहच न देता बाहेरूनच बॉक्समध्ये अर्ज टाकण्यास कार्यालयीन कर्मचारी यांच्याकडून सांगितले जात आहे. काही नागरिकांनी याबाबत हरकत घेतल्यास त्यांना बाहेरच थांबवून अर्जाची पोहच दिली जात आहे.
याठिकाणी आलेल्या नागरिकांना कामानिमित्त कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून दिले जात नाही यामुळे अगोदरच वादग्रस्त कामकाजात प्रसिद्ध असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या या प्रकारच्या कामकाजामुळे फलटण तालुक्यात प्रचंड नाराजी सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा भूमी अधीक्षक यांनी याप्रकरणी दखल घेऊन कार्यालयीन वेळेत कुलूप लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी व कार्यालय नागरिकांसाठी खुले करावे अशी मागणी नागरिकांच्यातुन होत आहे.
चौकट १) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) आंबेडकर गटाचे पदाधिकारी संजय गायकवाड, महादेव गायकवाड व अजित मोरे यांनी त्यांच्याकडे प्राप्त शेतकऱ्यांच्या तक्रारी नुसार जिल्हाधिकारी, जिल्हा भूमी अधीक्षक तसेच उपविभागीय अधिकारी फलटण यांच्याकडे नुकतेच निवेदन सादर केले असून या निवेदनात नियमबाह्यपणे कार्यालयीन वेळेत कुलूप लावल्याबद्दल व अर्जाची पोच न देता अर्ज बाहेरून बॉक्समध्ये टाकण्यास सांगितले जात असल्याच्या अनुषंगाने उपअधीक्षक भूमी अभिलेख फलटण यांच्याविरोधात कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
चौकट
२)मुजोर पद्धतीने भूमी अभिलेख कार्यालयास आतून कुलूप लावून नागरिकांची गैरसोय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती कडक कारवाई करावी, तसेच सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा याबाबत आंदोलन करण्यास भाग पाडू नये.:-संजय गायकवाड, फलटण तालुका अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर गट