फलटणच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये होतेय पेशंटची दमछाक सोयी-सुविधांची प्रचंड वानवा

 

फलटण : फलटण नगरपालिकेच्या वर्षानुवर्ष बंद अवस्थेत असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये चालु केलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे प्रचंड हाल होत असून या ठिकाणी दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राथमिक सुविधा पण मिळणे कठीण झाले आहे. हे रुग्णालय म्हणजे केवळ पालिकेचा दिखावा आहे कां? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

पिण्यासाठी पाण्याची सोय नाही की, आंघोळीसाठी पण गरम पाण्याची सोय नाही. दोन दोन दिवस रुग्णांना इथे आंघोळ करावयास सुद्धा पाणी मिळत नाही. रुग्णांना चहा दिला जात नाही. पिण्यासाठी गरम पाणी दिले जात नाही. याठिकाणी पाणी व इतर खाद्यपदार्थ पेशंटचे नातेवाईक गेटपर्यंत जाऊन पेशंटला डबा व पाणी देताना दिसतात, त्यातुन नातेवाईकांना व इतरांना पण कोरोना होण्याचा फार मोठा धोका आहे. तसेच एका ड्युटीसाठी रोटेशननुसार एक खाजगी डॉक्टर व एक सिस्टर यांच्यावर  25 ते 30 पेशंटची जबाबदारी आहे. जर या ठिकाणी रुग्णाची स्थिती खालावली तर अशावेळी लागणार्‍या व्हेंटिलेटरची सोयही उपलब्ध नाही किंवा आय.सी.यु.ची सुविधा नाही.
 याठिकाणी दाखल असणार्‍या एका रुग्णाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाच दिवसांमध्ये याठिकाणी एकच मावशी साफसफाईसाठी येत आहेत. पाच दिवसांमध्ये कोणीही सफाई कामगार याठिकाणी फिरकलेला नाही. संडास बाथरूमची अवस्था खूप दयनीय आहे. तिथे कसल्याही स्वरूपाची स्वच्छता केली जात नाही. सर्व हॉस्पिटलमधून कचरा ओसंडून वाहत आहे. ऍडमिट असणार्‍या रुग्णांच्या रूममध्ये साफसफाई तसेच त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी गेल्या पाच दिवसांमध्ये केलेली नाही. तसेच वारंवार याठिकाणी लाईट जात असून पेशंटची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ऑक्सिजन संपला तर ऑक्सिजन सुरू करावयाससुद्धा या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नाही, अशा तक्रारी दाखल रुग्णांकडून होत आहेत.
तरी प्रशासकीय यंत्रणेेने या तक्रारींची शहानिशा करुन सुविधा पुरवाव्यात अन्यथा रुग्णालय अन्यत्र स्थलांतरित करावे अशी मागणी जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!