बोगस सैन्या भरती प्रकरणी झारी निलंबित बनकर व शेख यांची बदली मुख्यालयात

फलटण : बोगस सैन्य भरती प्रकरणातील संशयित आरोपी आकाश डांगेला मदत केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी साहील झारी याला निलंबित केले आहे. तसेच शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप बनकर आणि फलटण ग्रामीणचे उपनिरीक्षक उस्मान शेख यांची सातारा पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.

याबाबत माहिती अशी, भारतीय सैन्य दल तसेच नौदलात भरतीचे आमिष दाखवून भाडळी बु॥ ता. फलटण येथील आकाश काशिनाथ डांगे आणि बारामती येथील नितीन जाधव यांनी राज्यातील शेकडो युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी दि. 19 जून रोजी आकाश डांगे व नितीन जाधव यांच्यावर भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी डांगे व जाधवला अटक करण्याचे आदेश पुणे ग्रामीणच्या एलसीबीला दिले होते. यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आकाश डांगे व नितीन जाधवच्या मुसक्या आवळल्या होत्या. दरम्यान, पोलीस तपासामध्ये डांगे व जाधवला फलटण शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच पोलीस शिपाई साहील झारी व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांनी मदत केल्याचे निदर्शनास आले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेवून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आकाश डांगेला मदत करणार्‍या उपनिरीक्षक संदीप बनकर, उपनिरीक्षक उस्मान शेख यांची उचलबांगडी मुख्यालयात केली तर फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी साहील झारीला निलंबित केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून आकाश डांगेने सैन्य भरतीचे आमिष दाखवून शेकडो युवकांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात आकाश डांगेच्या विरोधात अनेक तक्रारअर्ज आले होते. परंतू बनकर, शेख व झारीने या तक्रारअर्जांची पोलीस ठाण्याच्या बाहेरच विल्हेवाट लावली. जानेवारी महिन्यातच आकाश डांगेचा खास पंटर सचिन डांगेवर गुन्हा दाखल झाला होता. तपासात आकाश डांगेचे नावही समोर आले होते. परंतु, तत्कालीन तपास अधिकार्‍यांवरच आकाश डांगे व टीमने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी आकाश डांगे प्रकरणाचा पर्दाफाश करुन केला.
फलटण येथील सैन्य व नौदलातील बोगस भरतीप्रकरणी फलटण तालुका वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. फलटणमधील सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण संस्था (ऍकेडमी) या गेल्या अनेक वर्षापासून सैन्य दलात अनेक नवोदित युवकांना भरतीचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करीत होत्या. सैन्य दलातील परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी भारतीय सैन्य दलाने यापूर्वी तालुक्यात कारवाई केली होती. याच संस्थांच्या नादाला लागून आकाश डांगेने राज्यभरातील अनेक तरुणांना सैन्य भरतीचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!