सातारा दि. 9 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9.00 वा. ते सायंकाळी 5.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील असा आदेश पारीत करण्यात आला होता. त्या कारणास्तव विनाकारण लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सुरु ठेवण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 9.7.2020 रोजीच्या 17.00 वाजल्या पासून ते दि. 31.7.2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्येच चालु राहतील. कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांचे आदेश लागू राहतील.
सातारा जिल्ह्यात लग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी असून यामध्ये या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरील वधु,वर, वधु-वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहिण, सख्खे आजी-आजोबा यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल.