फलटण : तालुकास्तरावरील शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक पंचायत समितीत पार पडली. त्यावेळी सदरचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात, इन्कमटॅक्स – विवरणपत्रे व त्याची फी केंद्रप्रमुखांमार्फत संबंधीत कार्यालयास जमा करावी. सन 2020 / 21 मोफत पाठ्यपुस्तके वाहतूक मानधन अनुदान प्रत्येक मुख्याध्यापकास वितरीत करणे व त्याची पोहोच मिळावी. जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेतील प्रथम व सर्व क्रमांके बक्षीस मानधन संबंधीत शाळेस मिळावे. कॅनरा बँकेतून महिला शिक्षकांना सहकार्य केले जात नाही त्याबाबत बँकेशी चर्चा करावी. दरवर्षी प्रत्येक प्राथमिक शिक्षकांचे सेवापुस्तक अपडेट वेळच्यावेळी वेळी करावे. सर्व शाळांना सर्व इयत्तांची मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तके त्वरीत मिळावीत. डिमडेट प्रस्ताव त्वरीत मंजूर करावेत, आदी मागण्यांचा समावेश होता.
यावेळी फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समिती, सातारा जिल्हा एकल प्राथमिक सेवा मंच, फलटण तालुका शिक्षक संघ, फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघ, आयडियल बहुजन टिचर्स असोसिशयन आदी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.