सातारा दि. २२ (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाशिवंत मालाचे नुकसान होवून शेतकऱ्यांच्या पदरी तोटा येवू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा कृषी विभागाने तब्बल सात हजार क्विंटल फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी समन्वय घडवून आणल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संकट आणि लॉकडाऊन या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल ७ हजार १३५ क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेवून शेतकरी व प्रत्यक्ष ग्राहक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावली. लॉकडाऊनच्या काळामध्ये गावातील आणि शहरातील आठवडी बाजार बंद होते. त्यामुळे शेतमाल शेतामध्येच पडून राहण्याची भिती होती. शेतकऱ्यांची नेमकी हीच अडचण लक्षात घेत शेतकरी व ग्राहक यांच्यात केवळ दुवा म्हणून काम करत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिली आहे.
या शेतमालामध्ये ४ हजार ५४३ क्विंटल भाजीपाला आणि २ हजार ५९१ क्विंटल विविध फळांचा समावेश आहे. ही सर्व विक्री ऑनलाईन आणि थेट स्वरुपात झाली आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आजअखेर पर्यंतच्या केवळ तीन महिन्यामध्येच ही विक्री झाली आहे.
विविध शेतकरी गट तसेच शेतकऱ्यांना शहरातील सोसायट्यांशी समन्वय साधून लॉकडाऊन काळामध्ये फळे व भाजीपाला पुरवठा नियमित करण्याचे कामकाज कृषी विभागाने केले. शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाल्याला चांगला दर मिळाला. तसेच शेतकरी व ग्राहक अशा दोहोंना फायदा झाला. लॉकडाऊनमध्ये कृषी विभागाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले.
– विजयकुमार राऊत
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा
कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी एमसीडीसीच्या अंतर्गत आमच्या शेतकरी स्वयंसाह्यता समुहाची नोंदणी करण्यास मदत केली. तसेच पुणे येथील विविध सोसायटी ग्राहक म्हणून मिळवून दिल्या. यानंतर या समुहामार्फत आम्ही ४२ ते ४३ शेतकऱ्यांचा भाजीपाला एकत्रीत करुन तो पुणे येथे नेवून विकत होतो. यामधून आम्हा सर्व शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळातही चांगला नफा मिळाला.
– विजयसिंह पोपटराव भोसले, अध्यक्ष,
जिजामात शेतकरी स्वयं: सहायता समूह, पेरले. ता. कराड.
असा साधला समन्वय…
● शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी उपलब्ध बाजारपेठेची माहिती देणे.
● विविध शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे
● शेतमालाची थेट विक्री करु इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याला शहरातील ग्राहक मिळवून देणे.
●शेतकरी आणि प्रत्यक्ष ग्राहक यांच्यामध्ये शेतमाल विक्रीसाठी समन्वय ठेवणे.
●जमिनीचे तुकडीकरण टाळून गटशेतीसाठी प्रोत्साहन देणे.
शेतकऱ्यांना काय फायदा झाला
●शेतमाल पडून न राहता वेळीच बाजारपेठ मिळाली.
●लॉकडाऊनमध्ये आर्थिक नुकसान टळले.
● भविष्यातील विक्रीसाठी बाजारपेठेबद्दल माहिती मिळाली.
ग्राहकाला काय फायदा झाला
●बाजारासाठी बाहेर पडावे लागले नाही
●स्वतःच्या घराच्या दारावरती ताजा भाजीपाला
●थेट शेतकऱ्यांमार्फत स्वस्त दरात खरेदी
याकरीता कृषी विभागाने संपुर्ण जिल्ह्यामध्ये १० ते १५ शेतकऱ्यांचा मिळून ५०० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक गटांची स्थापना केली. या उत्पादक गटांच्या मालाची विक्री आणि थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी साधारण १६० विक्री केंद्र कार्यान्वित करुन दिले.
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!