प्रत्येकाचा एक ना एक दिवस येत असतो

मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.म्हणजे आमचे मास्तर त्याच्या खांद्याला लागायचे.अंगाने पैलवान असणारा गडी.पण अभ्यासात पार दरिद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.
     त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता की,वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची.त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि परिणामीत्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची.पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं आणि तो दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा.आणि पोरंही नानाला मारताना जोरात रट्टा द्यायची. अशा वेळी नाना डोळे गच्च मिटून हाताची घडी घालून उभा राहायचा.पोरांनी कधीच नानावर दया माया दाखवली नाही.मला मात्र नानाची फार कीव यायची.
    तरीही नाना दररोज शाळेत न चुकता यायचा.उलट सर्वांच्या आधी नाना वर्गात हजर असायचा.सकाळी आलेला नाना व्यवस्थित दिसायचा.आणि शाळा सुटल्यावरचा नाना म्हणजे दोन्ही गाल लालभडक ,सुजलेले आणि डोळे पार रडून रडून खोल गेलेले दिसायचे.एक दिवस शाळा सुटल्यावर मी जवळ जाऊन नानाला विचारलं, नाना कशाला शाळेत येतो?तुला काही येत नाही.रोज पोरं मारतात तुला.तू कुणाला काहीच बोलत नाहीस.मला कळत नाही एवढं सहन करूनसुद्धा तू कधी शाळा चुकवत नाहीस.कशासाठी हे तू करतोस.?त्यावर नानाने माझ्या डोक्यावर हात ठेवून केसातून हळुवार बोटे फिरवली.माझ्याकडे पाहत त्याने डोळे गच्च मिटले.डोक्यावरचा हात काढून घेतला आणि  तसाच पाठमोरा होऊन झपझप पावले टाकत निघून गेला.मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर  नानाने दिलंच नाही.
     रोज शाळा भरत राहिली.आणि रोज नाना न चुकता मार खात राहिला.तोंड सुजवून घेत राहिला.मास्तरने प्रश्न विचारला की आपोआप नाना मनानेच उभा राहायचा अगदी तसाच डोळे गच्च मिटून.आणि मग ज्या पोरानं उत्तर बरोबर दिलेलं असायचं ते उड्या मारत नानाजवळ जायचं आणि खाडकन नानाच्या जोरात मुस्काडीत द्यायचं.पाचही बोटे नानाच्या गालावर जशीच्या तशी उमटायची.आणि मी हे सगळं केविलवाणीपणे बघत बसायचो.
        आणि एक दिवस वेगळंचघडलं  तेअसं,मास्तरने एक प्रश्न विचारला,तो प्रश्न असा होता.
“गावाबाहेर बायका जिथं धुणं धुवायला जातात,त्या जागेला काय म्हणतात.?”
आम्ही सगळ्यांनी जमेल तशी उत्तरे दिली, कुणी सांगितलं,ओढा म्हणतात,नदी म्हणतात,वगळ,आड,विहीर,तलाव,तळं, डबकं,पोहरा म्हणतात तर कुणी कुणी खूप डोकं खाजवून काहीही उत्तरे दिली.पण मास्तर उत्तर चुकीचं आहे असंच सांगत होते.नाना शांत बसून सगळीकडे पाहत होता.सगळ्यांची उत्तरे चुकलेली होती.गोंधळ शांत झाला आणि नानाने हात वर केला.जसं नानाने हात वर केला तशी सगळी पोरं एकसाथ मान वळवून नानाकडे बघायला लागली.मास्तर ही नानाकडे एकटक बघतच राहिले.
     त्याच शांततेत नाना शांतपणे उभा राहिला.आणि हाताची घडी घालूनताठ मानेनं उत्तर दिलं,
“गुरुजी गावाबाहेर बायका ज्या जागेवर धुणं धुतात त्या जागेला पाणवठा म्हणतात.”
आणि एका झटक्यात गुरुजी म्हणाले,नाना लेका तुझं उत्तर बरोबर आहे.मास्तर जसं उत्तर बरोबर आहे म्हणाले तसा नानाने मोठा दीर्घ श्वास घेतला.वर्गातली सगळी पोरं थरथर कापायला लागली.आणि नानाने सगळ्यात आधी वर्गाचं दार लावून दाराची आतली कडी लावली.त्याने कडी लावल्याबरोबर सगळी पोरं मोठ्याने बोंबलायला लागली.मी शांतपणे नानाकडे पाहत होतो.मलाही एक त्याची मुस्काडीत बसणार होतीच.पण मनातून मी खूप आनंदी झालो होतो.नानाचा चेहरा लालबंद झाला होता.डोळे मोठे झाले होते,आणि नाना आता सगळ्या वर्गावर तुटून पडणार होता.मास्तरानीच नियम केलेला असल्यामुळे मास्तर नानाला अडवूच शकत नव्हते.तरीही नानाचा तो राग पाहून मास्तर दबकतच हळूच नानाला म्हणाले,”नाना जाऊ दे सोड लेकरं लहान आहेत…..” मास्तरचं वाक्य पूर्ण झालंच नाही.तोवर नानाने अक्षरशः मास्तरला लहान मुलासारखं दोन्ही  हाताने उचलून घेतलं आणि अलगद खुर्चीवर नेऊन ठेवलं.
     आणि त्यानंतर गेल्या जवळजवळ सात वर्षाचा तो अन्याय नानाला आठवला.पोरं हात जोडून ओरडत होती.मास्तरला विनवण्या करत होती.पण त्यांचाही नाईलाज होता.आणि नानाने सुरवात केली.एक एक पोरगं कॉलरला धरून नानाने उभं केलं.आणि नानाने असं झोडपून काढायला सुरवात केली की बस्स.एका मुस्काडीत पोरगं खाली आडवं होऊन पडायचं.ते बघून बाकीचे सगळे जोरात बोंबलायचे.नाना पेटलेलाच होता.सगळा वर्ग ओला होताना दिसायला लागला.त्याच्या एका रट्याने पोरं चड्डी ओली होईस्तोवर बोंबलत होती.काही पोरं ते बघूनच मारायच्या आधीच लघवी करत होती.वर्गातला कालवा वाढतच राहिला.नानाने जितकं आजवर घेतलं होतं ते व्याजासहित परत केलं.
      सगळ्यात शेवटी नाना माझ्याजवळ आला.मला त्याची कसलीच भीती वाटत नव्हती.उलट मला मनातून खूप आनंद झाला होता.नानाने माझी कॉलर धरली.हिसका देऊन मला उभं केलं.मी उभा राहिलो.नानाकडे एकटक पाहत राहिलो.माझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्याने समजून घेतला.नानाने माझी कॉलर ढिली केली.मुस्काडीत मारायला उचललेला हात  अगदी मायेने माझ्या गालावरून फिरवला.त्यावेळी माझ्या मोठ्या भावाची जागा नानाने घेऊन मनात घर केलं. गालावरून हात फिरवून त्याने अगदी  तसाच हात माझ्या डोक्यातून फिरवत म्हणाला,
“कळलं का?मी आजपर्यंत शाळा का बुडवली नाही ते? कारण मला माहित होतं एक  ना एक दिवस माझं उत्तर बरोबर येईल.आणि त्यादिवशी मी सगळा हिशोब चुकता करून टाकेन.” 
      नानाने त्याचं दप्तर उचललं.कडी काढून  दार उघडलं.आणि नाना वर्गाच्याचबाहेर नव्हे  शाळेच्याही बाहेर कायमचा निघून गेला.त्यानंतर नाना शाळेत कधीच दिसला नाही.
( *प्रत्येकाचा एक ना  एक दिवस येत असतो*)
*कुणाची स्तुती कितीही करा*
*पण*
*अपमान खुप विचारपुर्वक*
*करा*
*कारण*
*अपमान हे असे कर्ज आहे*
*जे प्रत्येक जण*
*व्याजासह परत करण्याची संधी* *शोधत असतो.*
      
आवडल्यास लाईक करा 👍

प्रा.नितीन महादेव नाळे एम.ए.एम.एस्सी जिओग्राफी, एम ए मराठी , एम ए अर्थशास्त्र बीएड डीएसएम (प्रसिद्ध व्याख्याते कवी निवेदक निबंध लेखक) भ्रमणध्वनी :- 9404247076

Share a post

0 thoughts on “प्रत्येकाचा एक ना एक दिवस येत असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!