उद्योजकांची व एसटी अधिकाऱ्याची बैठक संपन्न
बारामती:
एसटी महामंडळाने प्रवासी वहातूकी बरोबरच आता मालवाहतूक करण्यास प्रारंभ केला असून उद्योग व्यवसायीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बारामती आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक अमोल गोंजारी व एमआयडीसी आगाराचे व्यवस्थापक गोविंद जाधव यांनी बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे मालवाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली असून या विषयी माहिती देण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल असोसिएशन चे पदाधिकारी यांच्यासमवेत बारामती आगारात एका बैठकीचे आयोजन केले होते.
याप्रसंगी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेशाम सोनार, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, शेख वकील, संभाजी माने, राजेंद्र खैरे, अभिजीत शिंदे, शिवराज जामदार यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.
अध्यक्ष धनंजय जामदार यांनी एसटी महामंडळाच्या या नवीन उपक्रमाचे स्वागत करून सांगितले की हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून खाजगी मालवाहतूक व्यवसायिकांच्या मनमानी कारभार व नफेखोरीला निश्चितच आळा बसेल. सदर मालवाहतूक योजना अधिक प्रभावी व व्यापक करण्याची आवश्यकता असून आताच्या योजनेनुसार उद्योग व्यवसायिकांना कमी अधिक माल असला तरी संपूर्ण गाडीचे भाडे भरावे लागते.
लहान व्यवसायिकांना ही अट गैरसोयीची असून एसटीने पार्सल सेवा सुरू करणे आवश्यक आहे. तसेच मालवाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये दोन व्यक्तींना प्रवास करणेसाठी सशुल्क परवानगी देण्याची ही मागणी धनंजय जामदार यांनी यावेळी केली.
उद्योग व्यवसायासाठी एसटीची सुविधा फायदेशीर असून मालवाहतूक गाडीला हॉल्ट (मुक्काम ) ची सुविधा, विमासंरक्षण, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली आदी उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन देणार असल्याचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी सांगितले.
फोटो ओळ:एसटी अधिकाऱ्यां समवेत बारामती एमआयडीसी चे उद्योजक (छाया अनिल सावळेपाटील)