सलाम तुझ्या कर्तृत्त्वाला…

आज संध्याकाळी सहजच वार्‍याच्या सुंदर झुळूकेचा अनुभव घेत गाणी गुणगुणत बसले होते. रस्त्यावरचा शुकशुकाट पाहिला आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सतत ऐकू येणार्‍या गाण्याचे बोल नकळत ओठांवर येऊ लागले.
‘दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए’ आणि मग लक्षात आले की आज समाजातील प्रत्येक नागरिक ही जाणीव ठेऊनच तर वागायचा प्रयत्न करीत आहे. सगळे सुरळीत चालू असतानाच ‘कोरोना’ नावाच्या वादळाने देशात थैमान घातले. पण बघा ना, आपल्या देशातील लोक या वादळातही भक्कम पाय रोवून उभे आहेत. आज देशातील काही व्यक्तींचा खूप अभिमान वाटतोय. त्यांना अक्षरश: सतत सलाम करु वाटतोय आणि या देशाचा नागरीक असल्याचा गर्वही होतोय.
गेल्या काही महिन्यात ‘कोरोना’चे सावट इतक्या प्रमाणात असतानाही आपली जबाबदारी न विसरता अहोरात्र सेवेत कार्यरत असलेल्यांचा आवर्जून उल्लेख करु वाटतोय. स्वत:चे घरदार वार्‍यावर सोडून देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक, पोलीस आपापली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करणारे डॉक्टर्सही आपली जबाबदारी ओळखून आहेत. पण या सर्वांसोबत आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवणारा असा एक मोठा समाज कार्यरत आहे. आपण तर फक्त घरात बसून कोरोनाशी सामना करत आहोत पण हा जबाबदार लोकांचा समूह सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकाप्रमाणे ‘कोरोना’ सोबत झुंज देत आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोण आहेत हे सर्वजण ‘देवदूत’ की प्रत्यक्ष ‘देव’; की तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसे. हो ती सामान्य माणसेच आहेत जी आज सेवाप्रमाणे दिसत आहेत.
रस्त्यावर साफसफाई करणारे कर्मचारी, उन्हाळा आहे म्हणून तुमचे हाल होऊ नयेत म्हणून तुम्हाला अखंड वीजपुरवठा करणारे कर्मचारी, भल्या पहाटे उठून पाण्याची सोय करणारे कर्मचारी, नगरपालिकेतील सर्व कर्मचारी वर्ग, दुधासारख्या आवश्यक गोष्टी पुरविणारे लोक, बँकेतील कर्मचारी वर्ग, न्यूज रिपोर्टर, वेळोवेळी किराणा पुरविणारे दुकानदार, मेडिकलमधील लोक, पत्रकार, बाहेर गावाहून आपल्या गावात आवश्यक गोष्टी पुरविणारे गाडीवरील ड्रायव्हर हे सर्वजण देवदूतच तर आहेत. आपल्यासाठी घराबाहेर पडून आपला जीव उदार ठेवून कार्यरत आहेत हे सर्वजण. आणि म्हणूनच यांच्यामुळे आपण सर्वजण पोटभर खाऊ शकतोय आणि घरात सुखाची झोप घेत आहोत. एरव्ही जात, धर्म, पंथ यासाठी लढणारे आपण आज या कोरोनामुळे नकळत एकत्र आलो आहोत. देशाला वाचविण्यासाठी यात आपण जिंकणारच हे निश्‍चितच आहे. 
चला तर मग इतर काही करु शकत नसलो तरी या सर्व कर्मचारी वर्गाला ज्यांचा उल्लेख क्वचितच केला जातोय. त्यांना एक ‘सलामी’ देऊ आणि आपण त्यांच्या पाठीशी आहोत हे सांगून त्यांचा आत्मविश्‍वास वाढवू. 
जयहिंद जय महाराष्ट्र !

        सौ.श्रद्धा अनिल वेलकणकर, फलटण.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!