लॉज,हॉटेल,जिम,शाळा,कॉलेज,सलून व्यवसाय सुरू होण्याची अपेक्षा
बारामती : लॉक डाऊन लवकर उठावेत व व्यवहार सुरू व्हावेत अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.
शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल झाले असले तरी लॉकडाऊनपूर्वीसारखे बाजारपेठेचे वातावरण केव्हा होईल याचीच चिंता सर्वांना सतावत आहे.
शहरातील बससेवा व शाळा महाविद्यालयांचे कामकाज जोपर्यंत नियमित सुरु होत नाही. तोपर्यंत बाजारपेठेला पूर्वीची चमक येणार नाही, असेच सर्वांचे म्हणणे आहे. शहरातील बाजारपेठ सुरु झाली असली तरी म्हणावे, तसे ग्राहक फार कोणालाच उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
बारामती हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्याच्या विविध भागातून तसेच आसपासच्या तालुक्यातूनही बारामतीत खरेदीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. बससेवा तसेच सहा आसनी व तीन आसनी रिक्षा जोवर सुरु होत नाहीत, तोपर्यंत बाजारपेठेला नवी उर्जा येईल, अशी चिन्हे नाहीत.
सर्वांचेच व्यवसाय ठप्प आहेत, हॉटेलचालकांसह जिम व्यवसायिकांचीही कोंडी होत आहे. अनेक व्यवसाय परस्परांवर अवलंबून असल्याने सर्वच व्यवसाय व्यवस्थित सुरु होईपर्यंत वातावरणही बदलणे काहीसे अवघड वाटते आहे. बारामतीतील बससेवा सुरु करण्यात आली होती, मात्र जिल्हाअंतर्गत बस वाहतुकीस परवानगी होती, त्यातही काही प्रतिबंधित क्षेत्रात बस वाहतूक करणे शक्य नव्हते, त्यामुळे बस सुरु होऊनही प्रवासी नसल्याने अखेर पुन्हा एसटीचे चाक रुतले.
बारामती-पुणे बारामती या बससेवेस आणि शहर व तालुक्यातील शाळा महाविद्यालयांचे कामकाज जो पर्यंत नियमित सुरु होत नाही तो वर बारामतीच्या बाजारपेठेची गती मंद राहणार आहे. संध्याकाळी पाच वाजताच दुकाने बंद करण्याचाही फटका व्यवसायाला बसत असून किमान सात वाजेपर्यंत तरी दुकाने सुरु ठेवावीत अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
एमआयडीसीचे कामकाज सुरु झाले असले तरी त्यानेही अद्याप म्हणावा असा वेग पकडलेला नाही, दुसरीकडे बांधकाम प्रकल्पही संथ गतीने सुरु आहेत. बाजारपेठेला चालना देण्यासाठी पूर्वीचेच वातावरण कायम कसे राहिल याचा प्रयत्न प्रशासनाकडून व्हायला हवा अशी लोकांची मागणी आहे. सलून व्यवसाय सुद्धा लवकर सुरू करावेत अशी मागाणी नाभिक समाज बांधव व नागरिक करीत आहेत