राज्यात खासगी शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलेला असतानाच सरकारी शाळांसाठी काय? हा प्रश्न पुढे आहे, मात्र कर्जत-जामखेडमधील ४५८ शाळांचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी सोडवला. पवार यांच्या पुढाकारातून व झोहो कार्पोरेशनच्या माध्यमातून या दोन तालुक्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे २७ हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे पर्व सुरू झाले. आता येथील विद्यार्थी आता डिजीटल अभ्यासक्रम शिकणार आहेत. खासगी शाळांप्रमाणेच अधुनिक पध्दतीने येथील शिक्षक मोबाईलवर वर्ग चालवतील अन् मुलांच्या हजेरीपासून धडा गिरविण्यापर्यंत व गृहपाठापासून ते अगदी परीक्षेपर्यंत सारे काही शाळेसारखेच घडेल.. रोहित पवार यांनी दूरदृष्टीतून मुलांच्या शिक्षणासाठी केलेली ही नवी संकल्पना सर्वांनाच आवडली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशी संकल्पना राज्यात राबवण्यासारखी असल्य़ाचे मत व्यक्त करीत पवार यांचे कौतुक केले.
आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेडमध्ये सुरू केलेल्या डिजीटल शाळांचे ऑनलाईन उदघाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. यावेळी झालेल्या वेबिनारमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, झोहो कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबू, संचालक देव आनंद, नगरचे जिल्हा परीषद अध्यक्ष, उपाघ्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह कर्जत-जामखेड तालुक्यातील निवडक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.
रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये आमदार होण्यापूर्वी व झाल्यापासून शिक्षणावरती अधिक भर दिला आहे. प्राथमिक शिक्षण हा त्यांचा कळीचा मुद्दा असून त्यांनी यासाठी यापूर्वी इंटरॅक्टीव्ह लर्निंग संच देऊन विद्यार्थ्यांची जिज्ञासावृत्ती जागवली होती. आता कोरोनाच्या काळात प्राथमिक शाळांमधील शिक्षणाची दिशा मार्गस्थ करण्यासाठी अनेक प्रश्न समोर आहेत. त्यातच खासगी शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या मोबाईलवर अभ्यासक्रम पाठवून दररोजच्या ऑनलाईन शिक्षणाला सुरवातही केली आहे. अशा परिस्थितीत अस्वस्थ झालेल्या रोहित पवार यांनीही कर्जत-जामखेडमधील सरकारी शाळांमधील मुलांचे शिक्षण मागे राहता कामा नये यासाठी झोहो कार्पोरेशनच्या मदतीने व्हर्च्युअल अभ्यासक्रमाचा पर्याय शोधला. या दोन तालुक्यातील ४५८ शाळांमधील पहिली ते सातवीपर्यंतचे २७ हजार विद्यार्थी शिकू शकतील अशी नवी संकल्पना त्यांनी शोधली. यामध्ये पालकांच्या मोबाईलची शाळेतील संबंधित वर्गाच्या शिक्षकांकडे नोंदणी करून त्या मुलाचा वर्ग सुरू होतील. शिक्षक त्या वर्गाचे म्हणजे ग्रुपचे अॅडमिन असतील आणि हे शिक्षक त्या वर्गातील मुलांना दररोज सकाळी अभ्यासक्रम पाठवतील. त्या अभ्यासक्रमानंतर दिलेला गृहपाठ दुसऱ्या दिवशी तपासतील. ठरलेल्या दिवशी त्याची परीक्षा देखील घेऊ शकतील अशा प्रकारची ही नवी संकल्पना आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या,` रोहित पवार यांच्यासारखे तरूण आमदार हे राज्याला दिशा देणारे काम करीत आहेत. त्यांच्यामधील उर्जा ही शिक्षण विभागाला प्रेरणा देणारी आहे. सध्याच्या स्थितीत आम्ही देखील अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, संस्थांचे प्रमुख अशांकडून सूचना घेतल्या आहेत. रोहित पवार यांनी जी संकल्पना मांडली आहे, तशी संकल्पना राज्यातील प्राथमिक शिक्षणासाठी फार महत्वाची ठरेल असे वाटते.`
डॉ. अनिल पाटील म्हणाले,` रोहित पवार ज्या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत, त्या कर्जत तालुक्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९५० मध्ये पहिले महाविद्यालय स्थापन केले. त्यातून शिक्षणाची गंगा तालुक्यात पोचली. ते फिजीकली शिक्षणाचे पहिले पर्व होते. आता रोहित पवार हे डिजीटल एज्युकेशनचे नवे पर्व या तालुक्यात पोचवत आहेत, ही अतिशय कौतुकाची बाब आहे. रयत शिक्षण संस्था देखील ऑनलाईन शिक्षणाचा अंगीकार करून १.८५ लाख विद्यार्थ्यांपर्यंत दररोज ऑनलाईन शिक्षण देत आहे, ही आता काळाची गरज आहे.`
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले,` आमदार रोहित पवार यांची संकल्पना आजच्या स्थितीत तर खूपच महत्वाची आहे. त्यांनी योग्य वेळी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे.`
आमदार रोहित पवार म्हणाले,` दोन्ही तालुक्यातील मुलांचे शिक्षण मागे राहू नये अशी मनोमन इच्छा होती. शिक्षणाच्या बाबतीत कधीही या दोन तालुक्यातील मुले मागे राहणार नाहीत व पायाभूत शिक्षणाबाबत नेहमी अग्रेसर राहतील याच दृष्टीने आजवर विचार केला आणि त्यातूनच झोहो वर्गाची निर्मिती झाली आहे, ही संकल्पना जर इतर लोकप्रतिनिधींना आवडली, राज्य शासनाला आवडली तर इतरही ठिकाणी ती सुरू होईल अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागात मोबाईल व नेटवर्कच्या अडचणी असतील, मात्र त्यातूनही मार्ग काढावा लागेल. येत्या काळात त्यावरही पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.`
दरम्यान या उपक्रमाचे स्वागत विविध प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांतील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी केले.