फलटण दि. ५ : फलटण शहर व तालुक्यातील करोना रुग्ण हाय व लो रिस्क संपर्कातील सुमारे १०० व्यक्तींची इन्स्टिट्युशनल ठिकाणी जाऊन सकाळ/संध्याकाळ विना मोबदला वैद्यकीय तपासणी आणि फलटण शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबांना अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वितरणासाठी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या कामासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉ. योगेश साळुंखे यांचा सत्कार करुन त्यांना या सेवा कार्याबद्दल धन्यवाद दिले.
फलटण शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, किंबहुना शहरात करोना प्रवेश करणार नाही यासाठी नगर परिषद प्रयत्नशील असल्याचे लक्षात घेऊन डॉ. साळुंखे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग व शहरातील होमिओपॅथी डॉक्टरांचे सहकार्याने प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे शहरवासीयांना मोफत वितरण करताना त्या कशा घ्याव्यात, त्याचे फायदे काय वगैरे बाबी पत्रकाद्वारे शहरवासीयांना समजावून देण्यातही डॉ. साळुंखे आघाडीवर होते.
शहर व तालुक्यातील करोना बाधीतांचे संपर्कातील हाय रिस्क सुमारे १०० व्यक्तींना येथील मालोजीराजे शिक्षण संकुलामध्ये ठेवण्यात आले आहे, त्यांची दररोज सकाळ/सायंकाळ वैद्यकीय तपासणी, आवश्यक असतील तर औषधोपचार स्वखर्चाने करीत आहेत, वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक साधने, सुविधाही स्वतःची वापरत असल्याचे नमूद करीत नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले.