मांडवगण फराटा : बाभूळसर बुद्रुक ( ता. शिरुर ) येथे विद्यूत धक्क्याने वडीलांसह मुलाचा दुदैवी मृत्यु झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दत्तात्रय दगडू नागवडे ( वय – ५० ) व प्रसाद दत्तात्रय नागवडे (वय – १६ ) या दोघा पिता-पुत्रांचा मृत्यु झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत संतोष नारायण नागवडे यांनी मांडवगण फराटा पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. सविस्तर माहीती अशी की सोमवार ( ता.१ ) रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास दत्तात्रय नागवडे व त्यांचा मुलगा प्रसाद नागवडे हे घरासमोरील अंगणात काही काम करीत असताना दत्तात्रय यांचा खांबावरून आलेल्या वायरला स्पर्श होताच त्यांना जबरदस्त शॉक बसला. ते पाहून जवळच असलेला प्रसाद वडिलांना वाचविण्यासाठी पुढे गेला तर तोही वायरला चिकटला. घरासमोर एकच आरडाओरडा झाल्याचे ऐकून दत्तात्रय यांचे चुलत भाऊ संतोष नारायण नागवडे हे धावत तेथे गेले असता त्यांना हे दोघेही वायरचा शॉक बसून सुटण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसले. अश्विनी दत्तात्रय नागवडे या काठीने वायर बाजुला काढण्याचा प्रयत्न करीत होत्या. संतोष नागवडे यांनी सर्व इलेक्ट्रिक प्रवाह बंद करून दोघांना बाजूला केले. तोपर्यंत दोघेही बेशुद्ध पडले होते. दोघांनाही ताबडतोप मांडवगण फराटा येथील वरदविनायक हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी दत्तात्रय दगडू नागवडे मयत असल्याचे सांगितले. मुलाला प्राथमिक उपचार करून पुढील अत्यावश्यक उपचारासाठी दौंड येथे पाठवले. येथे उपचारा दरम्यान पहाटे मुलगा प्रसाद हा ही मयत झाला. या दुर्घटनेमुळे नागवडे कुटुंब व संपूर्ण बाभूळसर गावावर शोककळा पसरली आहे. दोघांवरही दुःखमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आबासाहेब जगदाळे, सुभाष रुपनवर, कॉन्स्टेबल योगेश गुंड, किरण डुके, अक्षय काळे हे करीत आहेत.