‘निसर्ग’ चक्रीवादळाने संभाव्य नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व विभागांनी सतर्क राहून उपाय योजना राबवाव्यात महाबळेश्वर, जावळी, वाई आणि पाटण तालुक्याला सतर्कतेच्या सूचना-जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा दि. 2 ( जि. मा. का ):   हवामान विभागाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात कोकण विभागात अरबी समुद्र किनाऱ्यावर 1 जून ते 4 जून कालावधीत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याबाबत हवामान खात्याने इशारा दिला आहे. या वादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन तसेच महाबळेश्वर, जावळी, वाई आणि पाटण या तालुक्याला विशेष सतर्क राहावे.या बाबत सर्व विभागांनी सतर्क राहून आपल्या विभागाशी सर्व त्या उपाययोजना राबविण्याच्या सुचना  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

     संभाव्य ‘निसर्ग या वादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे संभाव्य अतिवृष्टी, वादळ-वारे होऊन झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड होणे, विद्यूत खांब, तारांचे नुकसान होणे, वीज पूरवठा खंडीत होणे, संपर्क यंत्रणा खंडीत होणे, वाऱ्यांमुळे घर पडझड किंवा इतर बाबींचे नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व विभागांनी सतर्क राहून आपल्या विभागाशी सर्व त्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यानुसार पुढील आवश्यक त्या सुचनांचे पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. सर्व विभागप्रमुख व त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यालयात हजर रहावे, कोणत्याही कारणास्तव मुख्यालय सोडू नये. या वादळाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना सूचित करुन सतर्क राहण्याबाबत सूचना द्याव्यात.  सार्वजनिक बांधकाम विभागाने संभाव्य झाडे पडणे, रस्ते बंद होणे व इतर अपघात याबाबत विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करुन आवश्यक ती यंत्रसामुग्री व मनुष्यबळ तत्पर ठेवावे. विद्यूत विभागाने विद्युत खांब, तारा, वादळामुळे नुकसान झालेस झोननिहाय पथके तैनात ठेवून वीज पुरवठा त्वरीत पूर्ववत करण्याबाबत उपाययोजना राबवाव्यात. वादळामुळे संपर्क यंत्रणा ना-दुरुस्त झाल्यास बीएसएनल व संबंधित विभागांनी तात्काळ दुरुस्ती करावी अथवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध ठेवावी. कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे पूर्वकल्पना देवून सतर्क राहण्याबाबत अवगत करावे. पोलीस विभागाने संभाव्य वादळामुळे वाहतूक खंडीत झाल्यास वाहतूक पूर्ववत करण्याबाबत नियोजन करावे.

विशेष सतर्कता

विशेषत: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!