डोंबाळवाडी, ता.फलटण येथील ग्रामस्थांनी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार डोंबाळवाडी येथे दोन महिन्यापूर्वी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत फक्त एकदाच औषध फवारणी करण्यात आली आहे. सद्य स्थितीला मुंबई-पुणे आदी ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात लोक गावात आलेले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुन्हा एकदा औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी डोंबाळवाडी ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांचेकडे केली होती. परंतु ग्रामसेवकांनी औषध फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी नाही. त्यामुळे औषध फवारणी करता येणार नसल्याचे ग्रामस्थांना सांगितले अशी ग्रामस्थांची तक्रार असल्याचे शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले आहे. तसेच डोंबाळवाडी गावात अजुनपर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून मास्क, सॅनिटायझर वा आदी गोष्टींचे वाटप गावामध्ये करण्यात आलेले नाही. अशाप्रकारची ग्रामस्थांची तक्रार असल्याचेही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले आहे.
डोंबाळवाडी ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलुन समस्या काय आहे हे जाणुन घेणे आवश्यक समजले नाही. कामात व्यस्त असतील तर नंतरही त्यांचा फोन आला नाही. त्यामुळे मला थेट त्यासाठी आपणास मोबाईलवरुन संपर्क साधावा लागला व अशा अकार्यक्षम अधिकारी वर्गाची फलटण तालुक्याला गरज नसल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांना मोबाईलवरुन संपर्क साधून सविस्तर माहिती दिली.
चर्चेनुसार फलटण तालुक्यात बहुतांश गावात कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशाप्रकारे बेफिकीरी ग्रामपंचायतींकडुन होत असावी. तसेच मुंबई-पुणे आदी ठिकाणाहून फलटण तालुक्यातील गावागावात आलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणांत आहे. त्यासाठी पंचायत समिती प्रशासनाचे ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनावर नियंत्रण व लक्ष नसल्याचे उदाहरण म्हणजे डोंबाळवाडी ग्रामपंचायत असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले. तसेच आता आपणच फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत कारभारात गांभीर्याने लक्ष घालावे व गटविकास अधिकारी यांचेशी याबाबत सखोल विचारणा करुन फलटण तालुक्यातील सर्वच ग्रामसेवकांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी, मास्क, सॅनिटायझर, होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप वा आदी उपाययोजन करण्याचे सक्त आदेश द्यावेत. ग्रामसेवक अजुनही गावागावात ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मुक्कामी नसलेबाबतही विचारणा करावी. तसेच 14 व्या वित्त आयोगातुन ग्रामपंचायतींनी किती खर्च केला व प्रत्यक्षात किती सुविधा राबवल्या याचा आढावा घ्यावा. अशी डोंबाळवाडी ग्रामस्थांसह फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचेकडे मागणी केली असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले आहे.
तेव्हा सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व सदर प्रकरणात फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना विचारणा करुन ग्रामपंचायतींनी केलेल्या उपाययोजनांचा व खर्चाचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. तसेच ग्रामसेवक आपापल्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मुक्कामी राहुन 100% योगदान देत नसतील अशी ग्रामसभेची लेखी तक्रार आल्यास सदर ग्रामसेवकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करु असे ठामपणे सांगितले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले आहे.