केशकर्तन कारागिरांनी ग्राहकाला सेवा देताना सुरक्षेसाठी मास्क बरोबरच फेसशिल्ड वापरणे बंधनकारक – जिल्हाधिकारी शेखर सिंह

 सातारा दि. 27 (जिमाका): सातारा जिल्ह्यात 22 मे रोजी प्रतिबंधित क्षेत्र वगळून केशकर्तनालय व ब्युटी पार्लर दुकाने सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.  नाभिक दुकाने व ब्युटीपार्लरमध्ये  सेवा देणाऱ्या ग्राहकाला सेवा देताना मास्क लावता येत नसल्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आले होते या आदेशामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी  केले आहेत.
सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या  व्यक्ती व कारागिरांनी चेहऱ्यावर मास्क लावून त्यावर फेसशिल्ड लावणे बंधनकारक आहे. तसेच जो कारागीर ग्राहकाच्या घरी जाऊन केशकर्तन व दाढी करणार आहे. अशा कारागीरांनी  आपल्या चेह-यावर मास्क परिधान करुन त्यावर फेसशिल्ड वापरणे बंधनकारक राहील. व अशी सेवा दिलेल्या ग्राहकांची नोंद नोंदवहीमध्ये ठेवणे बंधनकारक राहील.
केशकर्तनालयामध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवावे. या रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी. त्याचप्रमाणे दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देवून त्याचवेळी पुन्हा येण्याची विनंती करावी. केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी. प्रथम ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा. केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर दुकानामध्ये कारागीर व ज्या व्यक्तीचे केशकर्तन, दाढी इ. करावयाची आहे अशा दोन व्यक्तीच दुकानामध्ये असतील. उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल. 
तसेच सलून दुकानामध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकार राहील. त्याचप्रमाणे एका ग्राहकाला वापरेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये. त्यासाठी ग्राहकांच्या संख्येइतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करुन ठेवावी.  काही सलून अथवा व्युटी पार्लरमध्ये फेस वॉशसाठी पाण्याच्या वाफेचा वापर केला जातो. त्यासाठी पाण्याचे वाफेत रुपांतर करण्याचे मशीन वापरले जाते. या मशिनवर लोखंडी किंवा स्टीलचे असलेली हत्यारे निर्जंतुकीकरण करता येईल. बाकीची हत्यारे ही सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुकीकरण करावे. दुकानामध्ये येणाऱ्या लोकांनी, दुकानाबाहेरील लोकांनी सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक राहील.  दुकान, परिसरातील नियमित साफसफाई व स्वच्छता करावी व विशेष खबरदारी घ्यावी. 
सुरक्षा आदेशाचे  उल्लंघन केल्यास पाचशे पासून 2 हजारापर्यंत दंड
दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास संबंधित दुकानधारकावर कडक कारवाई करण्यात येईल. दुकानामध्ये काम करणाऱ्या कारागीराने चेहऱ्यावर मास्क व फेसशिल्ड परिधान न केल्यास संबधित व्यक्तीवर रु. 500/- दंड आकारण्यात येईल तसेच दुकानामध्ये एका खुर्चीसाठी एका ग्राहकापेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. 
या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारण्याता येईल व  तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी. 
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!