फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्र वाचक, लेखक, पत्रकार, संपादक, वृत्तपत्रप्रेमी नागरिक यांच्यासाठी राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने करण्यात आले असल्याची माहिती, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.
स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची नुकतीच (दि.17) मे रोजी 174 वी पुण्यतिथी संपन्न झाली; त्यानिमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सध्या ‘कोरोना’ मुळे संपूर्ण जग अडचणीत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिता व त्या संबंधीत असणारा वृत्तपत्र व्यवसाय संकटात सापडला आहे. विशेषतः जिल्हा दैनिके व साप्ताहिके यांना हे संकट म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. म्हणूनच हा ज्वलंत विषय घेवून या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वृत्तपत्र वाचक, लेखक, पत्रकार, संपादक, वृत्तपत्रप्रेमी नागरिक अशा सर्वांसाठी खुली असून निबंधाचे विषय पुढीलप्रमाणे – 1) जिल्हा दैनिके व साप्ताहिके यांच्या पुढील समस्या व त्यावरील उपाय योजना. 2) कोरोना साथीच्या काळात वृत्तपत्रांची भूमिका. 3) कोरोना साथीच्या काळात वृत्तपत्रांकडून सर्व सामान्यांच्या अपेक्षा.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी वरील पैकी एका विषयावर आपला निबंध किमान 1500 शब्दात तयार करुन [email protected] या ई-मेल वर टायपींग स्वरूपात आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांकासह दिनांक 25 जून 2020 पर्यंत पाठवावा. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या उत्कृष्ट निबंधांसाठी रोख पारितोषिक अनुक्रमे प्रथम क्रमांक रु.3000/-, द्वितीय क्रमांक 2000/-, तृतीय क्रमांक 1000/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र लॉकडाऊन नंतर संस्था आयोजित करेल त्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
तरी पत्रकार, संपादक, वाचक, लेखक तसेच वृत्तपत्रप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने करण्यात आले आहे.