सातारा दि. 22 (जिमाका) : सद्य: स्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व जारी असलेले प्रतिबंधात्मक आदेश व लॉकडाऊनची नियमावली या पार्श्वभूमीवर मुस्लीम धर्मीयांनी रमजान ईद शांतेत व सुरळीत पार पाडावी. तसेच मशीद अगर सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरातच नमाज पठण करावे असे आवाहन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
आज पोलीस मुख्यालय सातारा येथे सातारा जिल्ह्यातील मुस्लीम धर्मीयांच्या प्रमुख व्यक्तींच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अपर पोलीस अधिक्षक, पोलीस उप अधिक्षक मुख्यालय सातारा, पोलीस निरीक्षक जिल्हा शाखा सातारा, अनिसभाई तांबोळी ,सातारा, युसुफ पटेल, कराड, फारुक पटवेकर, कराड, अफझल सुतार, महाबळेश्वर, गफुर अब्दुल मुजावर, वाई यांच्यासह प्रतिष्ठीत व समाजावर प्रभुत्व प्राप्त असलेले मुस्लीम बांधव उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कोरोनाची सद्य: स्थिती व जारी असलेले प्रतिबंधात्मक आदेश याबाबत सर्व उपस्थितांना माहिती देण्यातआली. या पार्श्वभूमीवर रमजान ईद सण साजरा करतेवेळी या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार होवू नये याकरीता घ्यावयाची काळजी, सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन करणे,ईदगाह, मशीद अगर सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरातच नमाज पठण करावे व असे नमाज पठण करतेवेळी योग्य प्रकारे सोशल डिस्टन्सींग राहील याची तंतोतंत काळजी घ्यावी. तसेच कारोनोचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधीत करण्यासाठी आपली प्रतिकार क्षमता वाढविणे याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या