कराड:
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. अभय जायभाये, यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. ” कोविंड-19 विरुद्ध शिवाजी विद्यापीठाचे उल्लेखनीय कार्य ” या विषयावर बोलताना ते म्हणाले की शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक म्हणजे लढणारे योद्धे आहेत. मी स्वतःसाठी नाही ही तर समाजासाठी आहे असे व्रत धारण करून समाजाची सेवा करत कोरोना विरुद्ध लढताहेत. शिवाजी विद्यापीठाचे हे योद्धे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आज संपूर्ण जगात कोरोनाचे तांडव सुरू आहे . गेल्या दोन महिन्यात जगभरात लाखो लोक कोरोना बाधीत झाले असून हजारो लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. आपल्या देशात व राज्यात देखिल बरीच जीवित व वित्तहानी झालेली आहे. आपले महाराष्ट्र राज्य कोरोना बाधित राज्यांमध्ये देशात आघाडीवर आहे. आपले राज्य संकटात असताना आमचे स्वयंसेवक म्हणजेच कोरोना योद्धे जिथे कमी तिथे आम्ही या तत्त्वाने लढत आहेत. कोरोना विरुद्ध लढताना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नियोजनबद्धरीत्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवून गरजूंना मदत केली आहे. विद्यापीठामार्फत घेतलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती देताना ते म्हणाले की सर्वच महाविद्यालयांनी कोरोना विषयक जनजागृती करताना पोस्टर प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, ऑडिओ व व्हिडीओ क्लिप तयार करणे, मास्कचे मोफत वाटप करणे, सानीटाईझर वाटप, अन्नधान्य किट वाटप, साफसफाई, मुक्या जनावरांना चारा वाटप असे विविध उपक्रम स्वयंसेवकांनी पूर्ण केले.
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने लॉक डाऊन काळात रांगोळी व पोस्टर प्रदर्शन, ऑडिओ व व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून जाणीवजागृती केली. त्याचबरोबर अन्नधान्य किट वाटप व मुक्या जनावरांना मोफत चारा वाटप केल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष शेळके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोरोणा लॉकडाऊन च्या काळात शासनाच्या “वर्क फ्रॉम होम” या संकल्पनेनुसार दररोज व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करून महाविद्यालयाचे कामकाज सुरू आहे. आत्तापर्यंत दोन वेबिनार, दोन ऑनलाईन व्याख्याने, कोरोना जनजागृती क्विज, विद्यार्थी संपर्क अभियान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन इत्यादी उपक्रम सुरू केलेले आहेत. विद्यार्थी जरी घरी असले तरी महाविद्यालय ऑनलाइन त्यांच्याशी सतत जोडलेले आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने देखील उल्लेखनीय असे कार्य केले आहे. ते पुढे म्हणाले की प्रा. अभय जायभाये यांनी शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सुवर्ण इतिहासात असेच मौलीक कार्य करून भर घालावी . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुभाष कांबळे यांनी केले तर प्रा. सचिन बोलाईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. अजय मालगावकर यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. सुरेश काकडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. प्रसाद शेळके यांनी तांत्रिक सहकार्य केले. या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, इतर महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी हजर होते.