मल्हारगड
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचारते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.
पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधिव टाके लागते. टाक्यांच्या जवळच ध्वजस्तंभ असून त्यावर सदैव भगवा विराजमान आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही. असेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहिरीतही पाणी नाही. या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा होता, किल्ल्यावर दुर्ग संवर्धन करणाऱ्या श्री शिवस्वराज्य सेवा संघाने त्यातील पूर्ण माती काढून तो ये-जा करण्यासाठी उघडा केला आहे. ७ पायऱ्या आहेत. उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे जरा मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि श्री क्षेत्र कडेपठारचे स्वरूप आले आहे. फक्त मल्हारगडवरच खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावरून कऱ्हा नदी, जेजुरीचा डोंगर, कडेपठार, वगैरे दिसतात. गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.
सासवड पासून ६ कि.मी.वर ‘सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला दिवसातून तीन वेळा बस जाते. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी मनोऱ्याच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.
फक्त ५-६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र राहण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते. सासवड येथे राहण्याची सोय होऊ शकते.
जेवण्याची सोय स्वतः करावी. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.