बारामती: वृत्तसेवा करोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद साधला. या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये
बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, भारत फोर्जचे सुशांत पुस्तके, पियाजियोचे जगदीश गंधे, जीटीएन ईंजिनीयरींगचे मिश्रा, डायनॅमिक्सचे जितेंद्र जाधव, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जेजुरी लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे आदी प्रमुख उद्योजक व पदाधिकारी या ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
लॉकडाऊनचा उद्योग क्षेत्रावर झालेला परिणाम, परप्रांतीय कामगार यांची मानसिकता व उपलब्धता, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपन्या करत असलेल्या उपाय योजना, महाराष्ट्र राज्यातील जादा वीजदर, तसेच लघुउद्योगांच्या अर्थकारणावर झालेला विपरीत परिणाम व इतर अनेक अनुषंगिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देश चीनमधील त्यांचे प्रकल्प बंद करून ते भारतात स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत, असे प्रकल्प महाराष्ट्रात विशेषता बारामती, इंदापूर, फलटण, टेंभुर्णी, जेजुरी आदी ग्रामीण भागात आणण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सुप्रिया ताई यांनी प्रयत्न करावेत व महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना द्यावी अशी आग्रही मागणी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी या बैठकीत केली. तसेच लघू उद्योगांना त्यांनी वसूल केलेली जीएसटी ची रक्कम काही कालावधीसाठी बिनव्याजी वापरण्यास मिळावी, राज्य शासनाने कर्ज हमी घेऊन लघु उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध करून द्यावे, अशा अनेक मागण्या उद्योजकांनी केल्या.
बारामती, जेजुरी, कुरकुंभ एमआयडीसी मधील उद्योगांच्या मागण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.