मुंबई (फलटण टुडे वृत्तसेवा): राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपापल्या गावी आता मोफत जाण्याची व्यवस्था राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने (एसटी) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोमवारपासून (ता. ११) ही सेवा सुरु केली जाणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणेनुसार प्रत्येक आगारातूनही अशा बसेस सोडण्यात येणार आहेत.
राज्याच्या विविध भागातून आलेले व इतर ठिकानी अडकून पडलेल्या विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच प्रवाशांना सोमवारपासून आपापल्या भागात जाता येणार आहे. यातही दोन टप्पे करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर संबंधित तहसीलदारांची परवानगी घेऊन जाता येईल. मात्र, एका एसटी बसमध्ये २२ प्रवासीच प्रवास करतील. त्यांना मास्क घालणे अनिवार्य असेल. २२ जणांच्या गटाने आपल्या आधारकार्ड क्रमांकासह अर्ज करून विनंती केल्यानंतर तहसीलदार संबंधित आगारप्रमुखांशी समन्वय साधून या गटाला इच्छित स्थळी पाठविण्याची व्यवस्था करतील.
ज्यांना एकट्याने प्रवास करायचा आहे, त्यांनी सोमवारपासून एसटीच्या वतीने सुरू होणाऱ्या पोर्टलवर माहिती भरुन ठेवायची आहे. यात २२ जणांचा गट पूर्ण झाला, की एसटीच्या वतीने संबंधितांना बस सुटण्याची तारिख, वेळ व ठिकाण कळविले जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागात लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना आपापल्या गावात परतणे सुलभ होणार आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या नागरिकांना ही बस परतीच्या प्रवासात परत घेऊन येईल, अशा पद्धतीने हे कामकाज चालणार आहे. त्यामुळे विनामूल्य लोक आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील. याबाबत सविस्तर परिपत्रकाची आम्ही वाट पाहत असून, सूचनेनुसार सोमवारपासून ही सुविधा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.