भुईकोट किल्ला :- चाकणचा भुईकोट किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो आहे

 फिरांगोजीने लेकराप्रमाणे मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच साडे तीनशे वर्षा पासून संवर्धन व जतनाच्या प्रतीक्षेत पुण्यापासून 20 मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्या नंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तट बंदी दिसू लागते.ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्राम दुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे.
इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा चाकण चा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे .याबाबत शासनाने योग्य त्या उपाय योजना करून संवर्धनासाठी खरेखुरे प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा दुर्गप्रेमी ,इतिहास संशोधक ,व नागरिक करीत आहेत. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा नेक,विश्वासू सहकारी हि पदवी , किल्लेदारीची वस्त्रे, आणि प्रेमानी उचंबळुन, भरुन आलेला ऊर संगाती घेऊन शिवरायांकडून चाकणकडे परतले.. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला.
शहिस्तेखानाच्या बलाद्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसं अगदी मातीचं छोटसं ढेकुळ, तरीही शहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल 55 दिवस लागले.खरं तर फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकण च्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही संग्रामदुर्ग किल्ला हि खाना कडे पाहून खदाखदा हसला असेल. या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर ‘इथे एक किल्ला होता’ असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का असा प्रश्न दुर्ग प्रेमी विचारू लागले आहेत. आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती. शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्ते खान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे.आधीचतो स्थलदुर्ग;पण खांद्काने वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चाललातोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शाहिस्ते खानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते. फिरंगोजी नरसाळ्याने सयाजी थोपटा ,मालुजी मोहिता, भिवा दूधावडा , बाळाजी कर्डीला याच्यासह शूर ३०० – ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे भिवा दूधावडा सह सव्वाशे मावळेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघलीसैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहस पर्व कडू घोट घेत संपले .
त्यानंतर संग्राम दुर्गाच्या दुरवस्थेचे सुरु झालेले फेरे अद्यापही कायम आहेत . शासनाकडून भूल थापांच्या आश्वासना शिवाय या 
किल्ल्याला काहीच मिळाले नाही .किल्लेदार फिरांगीजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या एकाकी प्रयत्नांना शासनाची असहकाराची भूमिका हरताळ
फासत आहे. भीषण संकटे येऊनसुद्धा किल्लेदार फिरांगोजीने चाकण चा हा किल्ला आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने 
राखला, सजवला आता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी वारंवार होऊ लागली आहे.चाकण च्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही संग्रामदुर्ग किल्ला हि खाना कडे पाहून तेंव्हा खदाखदा हसला असेल ,आता मात्र शासनाच्या अनास्थेने ढसाढसा रडत असेल … दरम्यान २०१२ च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात यास एक वर्षाचा कालावधी लोटूनही या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामास सुरुवात झालेली नाही. दरम्यान शासनाकडून उपलब्ध झालेल्या पहिल्या टप्प्यातील १ कोटींच्या निधीतून चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या रणमंडळा जवळील सुर्यमुखी दरवाज्या पासून एका बाजूची तटबंदी जवळपास पूर्ण झाली असून त्या लगतच्या भागातील बुरुंजाजवळील तटबंदीच्या मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. भग्नावस्थेतील तट बंदी व कोट शिल्लक राहिलेल्या चाकण च्या भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला अखेरच्या घटका मोजत असताना २०१४ च्या फेब्रुवारी पासून या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. राज्य शासनाने या किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता देत राज्याच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करून दोन वर्षे लोटली होती तरी दुरुस्ती व संवर्धनाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नव्हती त्यामुळे दुर्गप्रेमी आणि चाकणकर नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष वेगाने सुरुवात झाल्याने किल्ल्याच्या दुरावस्थेचे फेरे आता संपुष्टात येणार असून चाकणच्या संग्रामातील या साक्षीदाराची संवर्धनाची प्रतीक्षा आता संपली आहे. मात्र संपूर्ण किल्ल्याच्या संवर्धन आणि तटबंदी साठी आणखी निधीची गरज असून हा निधी केंव्हा उपलब्ध होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!