फलटण (रोहित वाकडे):-फलटण शहरातील कोरोना केअर सेंटरमध्ये आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण फलटण शहर हादरुन गेले आहे. कारण, एकीकडे प्रशासनाच्या सूचनांचे पालन नागरिक करत असताना दुसरीकडे मात्र केअर सेंटरमधीलच आरोग्य सेविका बाधित झाल्यामुळे त्या ठिकाणची यंत्रणा व सोयी सुविधांवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या केअर सेंटरमधील असुविधांमुळे आरोग्य कर्मचारी असुरक्षित असतील तर हा खूप मोठा धोका आहे. या आवाक करुन सोडणार्या परिस्थितीमुळे ज्या कुंपणात आपण स्वत:ला सुरक्षित समजतो ते कुंपणच जर शेत खात असेल तर विश्वास ठेवायचा कुणावरती? अशीच काहीशी मन:स्थिती फलटणकरांची झाली आहे.
जगभर कोरोनाचा थैमान अजूनही सुरुच आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50 हजाराच्या पुढे गेली आहे. तर राज्यातील रुग्ण संख्या 17 हजारहून अधिक आहे. सातारा जिल्ह्यानेही कोरोना रुग्णांच्या बाबतीत शंभरी ओलांडली आहे. अशा भीषण परिस्थितीत गेल्या दोन दिवसापर्यंत फलटण तालुक्यात 4 बाधीत रुग्ण होते. मात्र फलटण शहराला अद्याप कोरोनाची झळ बसलेली नव्हती. नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकही चांगला प्रतिसाद देत होते. शहरात ठराविक वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी – विक्री सुरळीत सुरु होती. पालिका कर्मचार्यांनी भर उन्हा-तान्हात घरोघरी फिरुन नागरिकांना पासचे वितरण केले होते. शहराच्या सुरक्षेसाठी सर्वच जण आपल्यापरीने योगदान देत आहेत. मात्र, दि. 6 मे रोजी फलटणची आरोग्य सेविका कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आणि परिस्थिती पुरती बदलून गेली. प्रशासनाला नाईलाजाने सुरु असलेली सर्व दुकाने तात्काळ बंद करावी लागली. नागरिकांच्या सुविधा ठप्प कराव्या लागल्या.
कोरोना केअर सेंटर हा देखील या परिस्थितीत ‘हायरिस्क’ एरियाच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांची सुरक्षितता अगोदर महत्त्वाची आहे. असे असताना त्या ठिकाणी काम करणारे आरोग्य सेवक, सेविका, डॉक्टर व इतर कर्मचारी यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट विना रुग्णांची सेवा करावी लागत आहे. कोरोना बाधित रुग्णांचे बेडशीट देखील चार दिवस कॅरिडोरमध्ये पडून होती. तसेच बायोमेडिकल वेस्ट देखील बकेटमध्ये एकाच ठिकाणी पडून असल्याचे सांगण्यात येत आहे. याच हलगर्जीपणामुळे सदर महिलेस कोरोनाची बाधा झाली असल्याची दाट शक्यता आहे. या हलगर्जीपणाचे परिणाम किती गंभीर आहेत आणि त्याचा प्रशासनाला व नागरिकांना किती त्रास होणार आहे याची कल्पना संबंधित आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांना नसेल कां? तरीही त्यांनी योग्य ती दक्षता का बाळगली नाही? कोरोना केअर सेंटरमधील सोयी-सुविधांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे की नाही? असे अनेक सवाल पुढे येत आहेत.
आता संबंधित महिलेचे कुटूंबिय, त्यांचे शेजारी, निकटवर्तीय यांच्यासह त्या महिलेचे सहकारी कर्मचारी, केअर सेंटरमध्ये दाखल असलेले नागरिक, गेल्या काही दिवसांमध्ये तेथून डिस्चार्ज मिळालेले नागरिक यांच्यावर व यदाकदाचित यातील कुणाला दुर्दैवाने बाधा झाली तर पुन्हा त्या व्यक्तीचे निकटवर्तीय या सर्वांवर यंत्रणेला लक्ष द्यावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जनतेवरचे निर्बंधही पुढच्या काही दिवसांसाठी अधिक कडक राहणार आहेत. फलटण नगरपालिका, जाधववाडी व कोळकी ग्रामपंचायत यांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागणार आहे. आलेल्या परिस्थितीलाही प्रशासन व जनता धैर्याने तोंड देईल पण आरोग्य यंत्रणेच्या चूका शहराला वेठीस धरणार; हे दुर्दैवी ठरणार आहे. त्यामुळे या गलथान कारभाराला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवालही सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
शेवटचा मुद्दा –
आता जवळ जवळ 50 हून अधिक दिवसांपासून जनता आपल्या घरात बंदीस्त आहे. आर्थिक संपन्नता असलेल्यांची व नसलेल्यांचीही मानसिकता खचत चालली आहे. एकीकडे उद्योग व्यवसाय संकटात सापडले आहेत, रोजगार नष्ट होत आहेत. शासन काही भागातील निर्बंध शिथील करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत इतके दिवस नियंत्रणात असलेली फलटण शहरातील परिस्थिती जर इथून पुढे बिघडली तर यंत्रणांना पुन्हा शुन्यातून कामाला लागावे लागेल. कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणाही मुख्य शिलेदार आहे. देशात सर्वत्र ही यंत्रणा चांगले काम करत आहे आणि ते अभिनंदनीय आहे. मात्र शर्टचे वरचे बटण जर लावायला चुकले तर खालची बटणे विस्कळीत होतात; तशी परिस्थिती फलटणकरांच्या नशिबी येवू नयेे एवढीच अपेक्षा आहे.