सातारा तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळून वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा संदर्भातील दुकाने सुरु

 

                सातारा दि. 8 ( जि. मा. का ) : सातारा तालुक्यातील कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा मिनाज मुल्ला यांनी परिपत्रकान्वये सातारा तालुक्यातील सदरबझार, गार्डनसिटी, प्रतापगंजपेठ, कारागृह, गेंडामाळ, कोडोली (शिवाजीनगर) ही प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळून सातारा शहरातील पोवई नाका ते नगरपालिका रस्ता, नगरपालिका रस्ता ते राजवाडा (राजपथ), पोवई नका ते शाहू स्टेडीयम रस्ता, एस. टी. स्टॅन्ड ते राधिका चौक( राधिका रोड), पोवाई नाका ते पोलीस मुख्यालयमार्गे मोती चौक या क्षेत्रामध्ये  रस्त्याकडेची  फक्त वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा संदर्भातील (किराणा, दूध,औषधे,फळे, भाजीपाला, पेट्रोलपंप इ. ) दुकाने सुरु राहतील व इतर सर्व दुकाने बंद राहतील.

                सातारा जिल्हा रेडझोन असल्याने, कंटेन्मेंट झोन सोडून खालील सूचनांचे पालन करण्यात यावेत.

                सलुन दूकाने, दारुची दुकाने सुरु होणार नाहीत. तसेच वाईन, बिअर शॉप्स, देशी दारु दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमीत होणार असल्याने सद्यस्थितीत त्यांना सुरु करण्यास परवानगी नाही.

                केवळ परवानगी असलेल्या कामांसाठी व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालीसाठी मुभा असल्याने तसेच चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालका व्यतिरिक्त जास्तीत जास्त 2 प्रवासी असतील व दुचाकी वाहनांवर मागच्या सीटवर व्यक्तीला बसता येणार नाही. तसेच सातारा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा  व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री 7 ते सकाळी 7 या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत.

                औद्योगिक आस्थापनांनी त्यांच्या कामगार किंवा  अधिकारी यांच्यासाठी सायं. 7 नंतरच्या प्रवासासाठी कंपनीच्या बसनेच प्रवास करावा. त्यासाठी त्यांच्याकडे इन्सिडंट कमांडर यांचेकडील पास आवश्यक आहे.  सायकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कोणतीही वाहतूक त्यांना  वैयक्तिक वाहनाने करता येणार नाही. तसेच परजिल्ह्यातून कर्मचारी किंवा अधिकारी यांना प्रवास किंवा कामासाठी परवानगी अनुज्ञेय नाही.

                शहरी भागातील  म्हणजे नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व मॉल्स, कॉम्प्लेक्स, बाजार संकूल, मार्केट बंद राहतील  (नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील भाग) तथापि, बाजारपेठ आणि बाजार संकुलामध्ये  अत्यावश्यक वस्तूची विक्री करणारी दुकाने यांना परवानगी राहील. तथापि दि. 2.5.2020 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट 1 नुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. सर्व एकल दुकाने किंवा निवासी संकुलातील सर्व दुकाने ही कंटेन्मेंट झोन वगळून इतर क्षेत्रात चालू राहतील. ग्रामीणभागातील मॉल वगळता सर्व दुकाने अत्यावश्यक व इतर (Essntial and non Essntial) असा भेद न करता सुरु राहतील. सर्व ठिकाणी सामाजिक अंतर (दो गज की दूरी) राखले जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच ही सर्व दुकाने सकाळी 9 वा. पासून ते सायं. 6 या वेळेतच सुरु राहतील.

                कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्व ठिकाणी शेती विषयक सर्व कामे सुरु राहतील. तथापि, सोशल डिस्टन्सिंग व  इतर सूचनांचे पालन करने बंधनकारक आहे.

                सातारा तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय  जागा व सर्व खाजगी जागा (जेथे सामान्य माणसांचा वावर आहे) अशा कोणत्याही ठिकाणी थूंकण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणीही थुंकल्यास त्यास 1000/- रु. दंड आकारण्यात येवून हा दंड जी जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल त्यांचेकडे जमा करावा किंवा हा दंडा त्या  स्थानिक स्वराज्य संस्थेने सक्तीने वसुल करावा.

                सर्व व्यक्तींनी घराबाहेर पडताना व घरी परत येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये  चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक असल्याने तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारण्यात येईल.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!