बारामती वर्ताहर: बारामती तालुक्यातील कटफळ येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व इतर संशयित, अशा एकूण 52 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठीचे नमुने पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
कटफळ गावातून मुंबई येथे रविवारी 3 रोजी उपचारासाठी दाखल केलेल्या 79 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व इतर लक्षणे जाणवणाऱ्या ग्रामीण भागातील 44 व बारामती शहरात उपचार घेतलेल्या हॉस्पिटलमधील 8 जण, अशा एकूण 52 लोकांचे नमुने मंगळवारी व बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींसह बारामतीकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.